निशिकांतदादा-विक्रमभाऊंची खडाजंगी : इस्लामपूर नगरपालिका सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:03 AM2018-06-14T00:03:16+5:302018-06-14T00:03:16+5:30

नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेवेत मागील कार्यवृत्त मंजूर करण्यावेळीच सत्ताधारी विकास आघाडीचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि पक्षप्रतोद विक्रम पाटील यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.

Nishikant Dada-Vikrambha Khaajangi: Islamapur Nagarpalika Sabha | निशिकांतदादा-विक्रमभाऊंची खडाजंगी : इस्लामपूर नगरपालिका सभा

निशिकांतदादा-विक्रमभाऊंची खडाजंगी : इस्लामपूर नगरपालिका सभा

Next
ठळक मुद्दे विकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर; पाच तासांच्या कामकाजानंतर १२ विषय तहकूब

इस्लामपूर : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेवेत मागील कार्यवृत्त मंजूर करण्यावेळीच सत्ताधारी विकास आघाडीचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि पक्षप्रतोद विक्रम पाटील यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. आमचा आवाज दाबू नका, कायद्याची भीती घालू नका, आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, अशा शब्दात विक्रम पाटील यांनी आवाज चढविल्यानंतर, संतापलेल्या नगराध्यक्षांनी, परवानगी दिल्यावर बोला, अन्यथा निलंबित करू, पोलिसांकरवी बाहेर काढू, असे सुनावले. यामुळे अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले.

नगराध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वसाधारण सभा झाली. मागील सभेचे कार्यवृत्त मंजूर करण्याच्या विषयावरच सलग तासभर नगराध्यक्ष आणि विक्रम पाटील या बंधूंमध्ये शाब्दिक खटके उडत होते. शिवसेनेचे आनंदराव पवार मध्यस्थी करत होते. तब्बल पाच तासांच्या कामकाजानंतर १२ विषय तहकूब करत सभेचे कामकाज थांबविण्यात आले.

विकास आघाडीच्या सुप्रिया पाटील यांनी, शहरामध्ये दारुबंदी करण्याच्या प्रस्तावाचा विषय सर्वात शेवटी ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर विक्रम पाटील यांनी, सर्व खेळ्या ठरवून केल्या जात असल्याचा आरोप केला. सभागृहात बोलण्यावरुन दोघांमध्ये बराचवेळ घमासान झाले. परवानगी दिल्यानंतरच बोला, आवाज चढवून बोलू नका, खाली बसा... या नगराध्यक्षांच्या सूचनांकडे कानाडोळा करत विक्रम पाटील यांनी, सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. कुणाचा अवमान होईल अशी भाषा नको. कायद्याची भीती घालू नका. कोण बाहेर काढतो ते बघतो... अशी वक्तव्ये केली. त्यावर नगराध्यक्षांनी, परवानगी दिल्यानंतर बोला. ज्यांना कायदा पाळायचा नाही त्यांनी बाहेर जावे, असे सुनावल्यावर पुन्हा वादंग माजले.

रस्तेकामावरुन विक्रम पाटील यांनी, शासनाकडून किती निधी आला ते सांगा, असे प्रश्न करत नव्याने रस्तेकाम वाढविण्याचा आग्रह धरला. मात्र नगराध्यक्ष भोसले-पाटील यांनी, एकदा ठराव झाल्यानंतर त्यामध्ये वाढ करता येणार नाही असे सांगत, त्यांची ही मागणी फेटाळून लावली. वैभव पवार यांनी, पालिका निवडणुकीत सर्वजण एकत्र लढलो आहोत. त्यामुळे विविध स्तरावरून निधी आणतानाही सगळे एकत्र असतात, अशी गुगली टाकली. विश्वनाथ डांगे, आनंदराव मलगुंडे, सुनीता सपकाळ, सतीश महाडिक, शहाजी पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी यांनीही चर्चेत भाग घेतला.


कचरा संकलनावरून गदारोळ
कचरा संकलन आणि त्याची वाहतूक करण्याच्या निविदेवरुन शहराचे आरोग्य सलाईनवर असल्याची बाब समोर आली. वैभव पवार यांनी निविदा भरलेल्या हौसेराव पाटील या ठेकेदाराचे काम व्यवस्थित नाही. त्यांच्याविरोधात तक्रारी आहेत असा अर्ज दिला होता. त्यावर जोरदार चर्चा झाली. राष्ट्रवादीने पाटील यांची पाठराखण केली. शकील सय्यद यांनी कचरा संकलनासाठी घंटागाडीची व्यवस्था सुरळीत करा, अशी मागणी केली. शहाजी पाटील यांनी, घंटागाडीअभावी कचरा ओसंडून वाहत असल्याकडे लक्ष वेधले. विक्रम पाटील यांनी, गेल्या चार महिन्यात घंटागाडी शोधून सापडली नाही, असा आरोप केला. डॉ. संग्राम पाटील यांनी, ठेकेदारांचा उन्माद वाढला आहे. पालिकेबाबत ठेकेदारांकडून अर्वाच्च भाषा वापरली जाते. त्यांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी केली. शेवटी सहा महिन्यांसाठी हा स्वच्छतेचा ठेका देण्याचा निर्णय झाला.

Web Title: Nishikant Dada-Vikrambha Khaajangi: Islamapur Nagarpalika Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.