निशिकांत पाटील, वैभव शिंदे भाजपवासी!

By admin | Published: May 22, 2017 11:21 PM2017-05-22T23:21:35+5:302017-05-22T23:21:35+5:30

निशिकांत पाटील, वैभव शिंदे भाजपवासी!

Nishikant Patil, Vaibhav Shinde BJP! | निशिकांत पाटील, वैभव शिंदे भाजपवासी!

निशिकांत पाटील, वैभव शिंदे भाजपवासी!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : माजी आमदार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. हा प्रवेश सोमवार, दि. २९ मे रोजी इस्लामपूर येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी स्वत:च्या भाजप प्रवेशाचा इन्कार केला आहे.
बागणी (ता. वाळवा) जिल्हा परिषद मतदार संघातून सागर खोत यांनी रयत विकास आघाडीतून निवडणूक लढवली होती. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार शेट्टी आणि खोत यांच्यामध्ये घराणेशाहीच्या मुद्द्यावरून वादाला तोंड फुटले. तेथून वैभव शिंदे यांनीही राष्ट्रवादीकडून लढत दिली होती. मात्र बंडखोर संभाजी कचरे यांच्याकडून खोत आणि शिंदे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे नेते, आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांनी कचरे यांना बळ दिल्याचा आरोप शिंदे समर्थकांकडून होत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली होती. त्याचवेळी वैभव शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता. परंतु त्यासाठी मुहूर्त सापडत नव्हता. त्यावेळी शिंदे, सदाभाऊ खोत, वैभव शिंदे, निशिकांत पाटील यांनी आष्टा येथे बैठक घेऊन भाजप प्रवेशाबाबत चर्चा केल्याचे सांगितले जाते. तेव्हा ‘लोकमत’ने ‘तुम्ही पुढे व्हा, आम्ही पाठीमागून येतो’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. सदाभाऊ खोत आणि विलासराव शिंदे यांनी केलेल्या त्या वक्तव्यांना आता दुजोरा मिळत आहे. २९ मे रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस इस्लामपुरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत यल्लमा चौकात शेतकरी मेळावा आणि जाहीर सभा होणार आहे. या सभेत नगराध्यक्ष पाटील व वैभव शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, अशी माहिती मिळाली.
खासदार शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात पडलेल्या दरीमुळे खोत यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी नगराध्यक्ष पाटील यांच्या मदतीने स्वत:चा गट मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही कट्टर कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीविरोधातील काही गट नाराज झाले आहेत.
राष्ट्रवादीच्या विरोधात मोट बांधण्यासाठी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांनीही प्रयत्न केले. नगरपालिकेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढविण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. परंतु खासदार राजू शेट्टी, मंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक यांच्या आग्रहास्तव विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली गेली. त्यातून निशिकांत पाटील यांनाही आघाडीकडे वळवण्यात यश आले. त्यानंतर पालिकेवर आघाडीचा झेंडा फडकला. नगरपालिका, जिल्हा परिषदेतील या ‘फॉर्म्युल्या’च्या यशानंतर भाजपवाल्यांनी अनेकांना प्रवेशासाठी गळ घातला आहे.
आघाडीच्या यशानंतर : प्रवेशाला बळ
जिल्हा परिषद निवडणुकीतही रयत विकास आघाडीला यश मिळाले. तेव्हापासून सदाभाऊ खोत, निशिकांत पाटील, वैभव शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली. आता मुख्यमंत्र्यांच्या दौरा २९ मेरोजी निश्चित झाला असून, त्यावेळी निशिकांत पाटील व शिंदे यांचा भाजपप्रवेश होणार आहे.

Web Title: Nishikant Patil, Vaibhav Shinde BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.