‘दंगल’कार नितीन चंदनशिवे यांना निवासस्थानाच्या चाव्या प्रदान, लोकसहभागातून बांधून दिलं घर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 06:41 PM2023-07-10T18:41:23+5:302023-07-10T18:42:02+5:30
घाटनांद्रे : सम्यक परिवर्तन संघाच्या माध्यमातून ‘दंगल’कार नितीन चंदनशिवे यांना घर देण्यात आले. कवठेमहांकाळ येथे हा गृहप्रदान सोहळा थाटात ...
घाटनांद्रे : सम्यक परिवर्तन संघाच्या माध्यमातून ‘दंगल’कार नितीन चंदनशिवे यांना घर देण्यात आले. कवठेमहांकाळ येथे हा गृहप्रदान सोहळा थाटात पार पडला. उद्योजक सी. आर. सांगलीकर, मठाधिपती तुकाराम महाराज (जत) यांच्या हस्ते व मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष राजा अदाटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
सम्यक परिवाराचे प्रमुख प्रा. अर्जुन कर्पे, पुरोगामी चळवळीचे जेष्ठ नेते प्रा. दादासाहेब ढेरे, पोलीस दलातील संजय पाटील, इतिहास संशोधक प्रा. गौतम काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नाट्यगृहात हा साेहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. या वेळी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष राजा अदाटे, मठाधिपती तुकाराम महाराज, उद्योजक सी. आर. सांगलीकर यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते ‘संविधान’ नावाच्या वास्तूची फीत कापून चंदनशिवे यांना या वास्तूची किल्ली प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजा अदाटे, अॅड वैभव गीते, किशोर दिपंकर यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या वारसांना निवारा बांधून दिल्यानंतर हा लोकसहभागातून घर बांधून देण्याचा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले.
उद्योजक सी. आर. सांगलीकर म्हणाले, तरुणांनी व्यवसायाकडे, उद्योगाकडे वळले पाहिजे. सम्यक परिवाराने हा राबवलेला सामाजिक उपक्रम स्तुत्य आहे. आपण त्यांच्या पाठीशी राहू.
यावेळी कवी सागर काकडे, जित्या जाली, रवी कांबळे, रामहरी वरकले, मोहन गोखले, दयानंद काळे, पी. के. कांबळे यांचे कविसंमेलन पार पडले. किशोर दिपंकर, सुरेखा कांबळे, उत्तम काटे, विक्रम कर्पे, सतीश गाडे, प्रा. अमोल वाघमारे यांनी चळवळीची गाणी गायली.
कार्यक्रमास युवा नेते शंतनु सगरे, अॅड वैभव गिते, मच्छिंद्र चव्हाण, राहुल गावडे, डॉ. सुदर्शन घेरडे, अक्षय अहिरे, डॉ. विवेक गुरव, महावीर माने, सुशील कांबळे, प्रशांत ऐदाळे, अक्षय गायकवाड, अजित कारंडे, संजय साबळे, भगवान सोनंद, बोधिसत्व माने, सर्जेराव खरात, बाळासाहेब सरवदे, रवी चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते.