सांगली महामार्ग सफरीचे नितीन गडकरींना निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 11:12 PM2018-08-26T23:12:44+5:302018-08-26T23:12:49+5:30
सांगली : मुंबई-गोवा महामार्गाची लाज वाटते, असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना येथील नागरिक जागृती मंचने सांगलीतील महामार्ग सफरीचे निमंत्रण दिले आहे. त्या महामार्गाची लाज वाटते, तर सांगलीतील महामार्गांचा अभिमान वाटतो का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी याबाबत सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी गडकरी यांनी मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गावर केलेल्या वक्तव्याचे ‘लोकमत’मधील वृत्त झळकविले आहे. यावर विविध संघटना, नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. गडकरींनी एकदा सांगली-तुंग आणि सांगली ते अंकली या रस्त्यांचा दौरा करावा, म्हणजे त्यांना या महामार्गांबद्दलची व्यथाही कळेल. त्यांच्या या रस्त्यांबाबतच्या भावना जाणून घेण्याची इच्छा सांगलीकरांना राहील, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
साखळकर म्हणाले की, सांगलीतील महामार्गांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यापेक्षा वाईट येथील संबंधित विभागाचा कारभार आहे. कामाची मुदत संपत आली तरी त्याची सुरुवात झालेली नाही. सांगली-पेठ या एकाच रस्त्यावरील दोन टप्प्यातील काम पूर्ण होताना तिसºया टप्प्याचे काम रेंगाळतेच कसे? संयम राखून जिवाशी चाललेला खेळ पाहत बसायची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. आम्ही याप्रश्नी अजिबात संयम बाळगणार नाही.
गडकरींना जर मुंबई-गोवा महामार्गाची लाज वाटत असेल, तर सांगलीच्या महामार्गांचा अभिमान वाटतो का? तसे असेल तर त्यांनी त्याबाबत जाहीर घोषणा करावी. एकवेळ त्यांनी या महामार्गांची अवस्था पाहावी आणि त्यांचे मतही मांडावे. आम्ही सर्वच पक्षांच्या लोकांना याबाबत जबाबदार धरत आहोत.
प्रत्येकाच्याच सत्ताकाळात या रस्त्यांची दुखणी कायम राहिली आहेत. त्यामुळे ज्यांना अशा रस्त्यांची लाज वाटते, मनस्ताप होतो, त्यांनी किमान अभिमानास्पद वाटण्याजोगे चांगले रस्ते करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
‘त्या’ विमानाचे : सोशल उड्डाण
सांगली-तुंग या रस्त्याच्या दुर्दशेवर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर जागृती मंचने यावर विडंबनात्मक व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले. सांगली ते तुंग या मार्गाचे विमान व त्यात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींची सवारी, अशा आशयाचे हे व्यंगचित्र होते. त्याला पसंती दर्शवितानाच अनेकांनी याबाबत लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाºयांची खिल्ली उडविली आहे. सध्या सोशल मीडियावर हे विमान उड्डाण घेत फिरत आहे.