शिवरायांचे चित्र करणार गरिबाघरच्या लेकीचे कल्याण; शिक्षणासाठी मदतीचे आवाहन

By अविनाश कोळी | Published: August 18, 2023 06:33 PM2023-08-18T18:33:34+5:302023-08-18T18:33:56+5:30

नितीन नायक यांचा पुढाकार, तिच्या मनातील हे द्वंद्व ओळखले आणि त्यांनी तिच्यासाठी निधी उभारण्याचा निर्णय घेतला.

Nitin Nayak gave support to a poor girl in Sangli | शिवरायांचे चित्र करणार गरिबाघरच्या लेकीचे कल्याण; शिक्षणासाठी मदतीचे आवाहन

शिवरायांचे चित्र करणार गरिबाघरच्या लेकीचे कल्याण; शिक्षणासाठी मदतीचे आवाहन

googlenewsNext

सांगली : गरिबाघरची गुणवत्ता नेहमीच आर्थिक पाठबळाअभावी खचून नष्ट होत असते. अशीच पार्श्वभूमी असलेल्या आठवीत शिकणाऱ्या एका मुलीच्या चित्रकलेने अनेकांना थक्क केले. या मुलीने भेट दिलेले छत्रपती शिवरायांचे सुंदर चित्र सांगलीचे डॉ. नितीन नायक यांनी विक्रीस काढले आहे. तेही तिच्या शिक्षणासाठीच.

कुपवाडच्या शाळेत शिकणाऱ्या व याच परिसरात एका छोट्याशा खोलीत कुटुंबासह राहणाऱ्या अंजली शेळकेने डॉ. नायक यांना वाढदिवसानिमित्त शिवरायांचे एक चित्र भेट दिले. हे चित्र पाहून नायकही थक्क झाले. त्यांनी तिच्यातील कलागुणांची पारख केली. तिने पुढे जाऊन फाईन आर्टचे शिक्षण घ्यावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. पण, शिक्षणासाठीचा खर्च करण्याइतपत त्या मुलीची आर्थिक स्थिती नसल्याने तिच्या चेहऱ्यावर नकारात्मक भाव निर्माण झाले.

नायक यांनी तिच्या मनातील हे द्वंद्व ओळखले आणि त्यांनी तिच्यासाठी निधी उभारण्याचा निर्णय घेतला. शैक्षणिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ सेवा करुन आता सामाजिक कार्यात गुंतलेल्या नायक यांनी गरिब, वंचित घटकातील मुलींला शैक्षणिक, वैद्यकीय मदत केली व उभारली आहे. त्यामुळे त्यांनी या मुलीलाही तिच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मदतीचा दृढ निश्चय केला. भेट मिळालेले शिवरायांचे सुंदर चित्र त्यांनी विक्रीस काढले. समाजातील दानशूर लोकांना त्यांनी हे चित्र खरेदी करुन गरिबाघरच्या लेकीला शिकण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले.

सोशल मीडियावरही आवाहन

सोशल मीडियावरुनही या मुलीचे चित्र त्यांनी व्हायरल केले. तिच्याबाबतची माहिती देऊन समाजातील दानशूर लोकांना हे चित्र खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या चित्राच्या आधारे तिच्या पुढील शिक्षणासाठी निधी जमा करुन ठेवला जाणार आहे.
कोट

अंजलीमध्ये एक मोठी कलाकार लपली आहे. तिला पाठबळ देऊन कलाक्षेत्रात पुढे जाण्यासाठी मी हे अभियान हाती घेतले आहे. नेहमीप्रमाणे समाजातून मदतीचा हात मिळेल, याचा विश्वास आहे. - डॉ. नितीन नायक, सांगली

Web Title: Nitin Nayak gave support to a poor girl in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.