मोदींवर नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू अंकुश ठेवतील - ॲड. असीम सरोदे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 01:16 PM2024-06-10T13:16:26+5:302024-06-10T13:17:06+5:30
सांगलीत विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे व्याख्यान
सांगली : नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या निमित्ताने देशात अघोषित आणीबाणीचा तिसरा अध्याय सुरू होत आहे; पण नितीशकुमार व चंद्राबाबू नायडू त्यांना नियंत्रित करतील, अशी अपेक्षा आहे. मोदी यांनी शपथ घेताना देशभरातील शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे, असे प्रतिपादन ‘निर्भय बनो’ मोहिमेचे प्रणेेते ॲड. असीम सरोदे यांनी केले.
सांगलीत रविवारी विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे आयोजित ‘कायद्याच्या राज्याचे पैलू आणि संविधान’ या विषयावरील व्याख्यानावेळी ते बोलत होते. कष्टकरी नेते बापूसाहेब मगदूम, नामदेवराव करगणे व ॲड. के. डी. शिंदे यांना अभिवादनासाठी नगर वाचनालयाच्या सभागृहात ॲड. सरोदे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पुरोगामी नेते व्ही. वाय. पाटील होते.
ॲड. सरोदे म्हणाले, लोकसभेच्या प्रचारात आमिषे दाखवली गेली. त्याबद्दल तक्रारीही झाल्या. मोदी, अमित शहा यांच्याविरोधातील तक्रारींची दखल घेतली गेली नाही; पण मतदारांनी ताकद दाखवत गुर्मी उतरवली. कायद्यापेक्षा तुम्ही मोठे नाही, हे दाखवून दिले.
हद्दपारीची वाईट प्रक्रिया निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात वापरली. अनेक जिल्ह्यांत याद्या तयार करून विरोधकांना हद्दपार केले. हे योग्य नाही. पोलिस अशी कामे करतात, तेव्हा वाईट वाटते. कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात शेतकरी मृत्युमुखी पडण्यास मोदीच जबाबदार आहेत. फक्त ५६ इंच छाती दाखवू नका, मनात किती दम आहे ते दाखवा. फक्त जातिधर्मांत भांडणे लावतात, म्हणूनच मोदी हे पंतप्रधान होण्याच्या लायकीचे नाहीत. ते फार दिवस राहणारही नाहीत.
सरोदे म्हणाले, राहुल गांधींना घरातून, संसदेतून बाहेर काढले; पण ते झगडून परत आले. ते झगडणाऱ्या माणसाचे प्रतीक आहेत. त्याच राहुलना विरोधी पक्षनेता म्हणून सन्मानाने संसदेत पहिल्या बाकावर बसविण्याची वेळ मोदींवर आली आहे. लोकांना पैसे वाटत मोदींनी देशाला भिकारी केले आहे. नव्या कायद्यात देशद्रोह कलम आणखी मजबूत केले आहे; पण हे काळे ब्रिटिश फार काळ चालणार नाहीत.
यावेळी प्रा. बाबूराव गुरव, ॲड. अमित शिंदे, विकास मगदूम, अजितराव सूर्यवंशी, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, ॲड. सुभाष पाटील, संपतराव पवार, आदी उपस्थित होते.
..यासाठी कलम ३७० हटविले
सरोदे म्हणाले, काश्मीरमध्ये जगातील सातव्या क्रमांकाचा लिथियमचा साठा सापडला. तो बाहेर काढण्यासाठीच कलम ३७० हटविले. उद्योगपतींना तेथे जमिनी घेता याव्यात याची सोय केली. देशभक्तीच्या नावाखाली देशाची लूट करण्याचे उद्योग सुरू आहेत. मुस्लिमांविरोधात चित्रपट काढून भीती निर्माण केली जात आहे. अचानक हिंदू खतरे में सांगितले जात आहे. त्यामुळे चित्रपटांचाही धोका लक्षात घेतला पाहिजे. त्यांच्याकडे पाळीव भाडोत्री अभिनेते आहेत. द्वेषावर आधारित देशभक्ती निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न लोकांनी निवडणुकीत हाणून पाडला.
भिडे यांना अटक का नाही?
सरोदे म्हणाले, २०१४ ते २०२४ पर्यंत यंत्रणांचा गैरवापर झाला. विरोधी नेत्यांनाच पकडले गेले. अजित पवारांवर मोदींनी आरोप केले आणि दुसऱ्या दिवशी तेच उपमुख्यमंत्री झाले. २०१४ पासून देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात १९० टक्के वाढ झाली. मग सांगलीत मनोहर भिडेंना का अटक केली नाही? १५ ऑगस्ट रोजी त्यांनी भगव्याची मिरवणूक का काढली? हेच एखाद्या मुस्लिमाने केले असते, तर चालले असते का?
नायडू, नितीशकुमारांच्या अटी
सरोदे म्हणाले, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांनी सरकारला पाठिंबा देताना घातलेल्या अटी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शहा गृहमंत्रिपदावर नकोत, मोदींनी दोन महिन्यांतून एक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, अशा अटी घातल्या आहेत. त्या मान्य होतात का, ते पाहावे लागेल.
सरोदे म्हणाले..
- २०१७ ते २०१९ दरम्यान सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश का नेमले नाहीत हे मोदी, शहांनी सांगावे.
- संविधान मान्य असल्यास मनुस्मृती वाईट हे मोदींनी सांगावे. राजस्थान न्यायालयाच्या आवारातील मनूचा पुतळा हटवावा.
- जरांगेंच्या भीतीने फडणवीसांनी मराठवाड्यात सभा घेतली नाही.
- न्यायाधीशांच्या कामाचे मूल्यमापन व्हायला हवे.
- इंदिरा गांधींनी आणीबाणीची चूक समजल्यावर माफी मागितली.