महापालिकेचे १०० बेडचे कोरोना सेंटर पुन्हा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:25 AM2021-03-19T04:25:41+5:302021-03-19T04:25:41+5:30
सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आता महापालिकेचे शंभर बेडचे कोरोना केअर सेंटर ...
सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आता महापालिकेचे शंभर बेडचे कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरू होणार आहे. याबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासनाला आदेश दिले असून मिरज पॉलिटेक्निक येथे केअर सेंटर उभारणीचे काम गतीने सुरू करण्यात आले आहे.
सांगली, महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण वाढत चालल्याने महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी तातडीने महापालिकेचे १०० बेडचे सेंटर सुरू करण्याचे आदेश आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांना दिले होते. यानुसार आरोग्य विभागाने मिरज एमआयडीसीमधील शासकीय पॉलिटेक्निक येथे १०० बेडचे कोरोना केअर सेंटर उभारण्याचे काम गतीने सुरू केले आहे.
येणाऱ्या काही दिवसांत मनपा क्षेत्रात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपचारासाठी रुग्णांची गैरसोय होऊ नये आणि तत्काळ उपचार करता यावेत यासाठी आयुक्त कापडणीस यांनी कोरोना केअर सेंटर सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मिरजेतील शासकीय पॉलिटेक्निक येथे १०० बेडचे कोरोना केअर सेंटर उभारले जात आहे. यामध्ये रुग्णांवर उपचार आणि अन्य सेवा महापालिकेकडून मोफत दिल्या जाणार आहेत. भविष्यात रुग्णसंख्या वाढल्यास आशा रुग्णांना मिरज पॉलिटेक्निक येथे उपचारासाठी दाखल केले जाईल आणि उपचार केले जातील, अशी माहिती नितीन कापडणीस यांनी दिली.