जातनिहाय जनगणनेस नाही, आमचा विरोध जातीय राजकारणाला - केशव प्रसाद मौर्य
By अविनाश कोळी | Published: June 12, 2023 06:49 PM2023-06-12T18:49:26+5:302023-06-12T18:50:13+5:30
विरोधकांना अद्याप पंतप्रधान मोदींविरोधात एकही उमेदवार निवडता आलेला नाही
सांगली : काँग्रेस, समाजवादी पक्षासह विरोधकांनी आजवर जातीय राजकारण केले. भाजपने या गोष्टीला फाटा दिला. जातनिहाय जनगणनेस भाजपने विरोध केला नाही. आमचा विरोध जातीय राजकारणाला आहे. त्यामुळे सरकार याविषयी योग्य निर्णय घेईल, असे मत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केले.
ते म्हणाले की, जातनिहाय जनगणनेवरून विरोधक टीका करीत असतात. त्यावरून राजकारण सुरू आहे. केंद्र सरकार व भाजपचे वरिष्ठ नेते याबाबत योग्य ती भूमिका घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. कितीही प्रयत्न केले तरी भाजप व मोदींना ते पराभूत करू शकत नाहीत.
देशात लोकसभा जागांचा विक्रम यंदा होईल. काही राज्यांमध्ये मित्रपक्षांशी मतभेद झाले असले तरी त्यामुळे पक्षावर लोकांचा विश्वास कमी झालेला नाही. लोकसभा निवडणुकीत आजही अनेक मित्रपक्ष सोबत आहेत.
विरोधकांना अद्याप पंतप्रधान मोदींविरोधात एकही उमेदवार निवडता आलेला नाही. यावरून विरोधकांची अवस्था स्पष्ट होते. देशभरात आता विरोधकांची ताकद संपुष्टात आली आहे. यावेळी खासदार संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, पृथ्वीराज पवार आदी उपस्थित होते.
..तर भाजपकडे एकहाती सत्ता असती
मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर भाजपने युती केली नसती तर स्पष्ट बहुमत मिळवून भाजप सत्तेत आली असती. बिहारमध्ये भाजपपेक्षा छोट्या पक्षाला मुख्यमंत्रिपद व महाराष्ट्रात भाजपचा या पदावर असलेला आग्रह या सर्व गोष्टी पक्षश्रेष्ठींनी तत्कालीन परिस्थिती पाहून ठरविल्या आहेत. यात विरोधाभास काहीच नाही, असे मौर्य म्हणाले.
आम्ही खेळाडूंचा सन्मान करतो
बृजभूषण सिंह यांच्याविरोधातील आरोपांची सध्या चौकशी सुरू आहे. त्यातून सत्य उजेडात येईल, मात्र खेळाडूंचा आम्ही सन्मान करतो. त्यांना कधीही झिडकारले नाही, असे मत मौर्य यांनी व्यक्त केले.
चौकट
आरोपींची अशी हत्या अयोग्यच
उत्तर प्रदेशात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या काही आरोपींची हत्या झाली. अशाप्रकारच्या घटना लोकशाहीमध्ये अयोग्य आहेत. भाजप त्याचे समर्थन करीत नाही. एन्काउंटरबाबत मात्र आम्ही पोलिसांचे समर्थन करतो. सर्वच पक्षांच्या सरकारमध्ये अशा चकमकी होत असतात, असे मौर्य यांनी सांगितले.