जातीच्या दाखल्यासाठी पुराव्यांची सक्ती नको, वडार समाज संघटनेचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By संतोष भिसे | Published: July 24, 2023 05:07 PM2023-07-24T17:07:57+5:302023-07-24T17:08:19+5:30
समाजाच्या प्रगतीत अडथळे
सांगली : महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटनेतर्फे सोमवारी (दि. २४) सांगलीतजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाध्यक्ष विनायक कलकुटगी यांनी नेतृत्व केले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
विश्रामबाग चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. पिवळे ध्वज घेतलेले महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भर पावसात मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. महिला आंदोलक अग्रभागी अखंड घोषणाबाजी करत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी मोर्चा रोखला. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
आदोलकांच्या मागण्या अशा : जातीचा दाखला व जात पडताळणीसाठी आवश्यक १९६१ च्या पुराव्याची अट शिथिल करावी, पॅरामेडिकल व्यवसाय व व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी समाजातील विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये सवलत मिळावी, दगडफोडीचे काम करणाऱ्या ५० वर्षे वयावरील महिलांना बांधकाम कामगार महामंडळाकडून दरमहा निवृत्तीवेतन मिळावे.
आंदोलकांचे नेते विनायक कलकुटगी म्हणाले, कष्टकरी असलेल्या वडार समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. समाजाचा पारंपारीक व्यवसाय बांधकाम मजुरी आहे. समाजबांधवांच्या उदरनिर्वाहाचे हेच मुख्य साधन आहे. कामाच्या गरजेपोटी सतत भटकंती करत असतो. एका ठिकाणी जास्त दिवस राहत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे रहिवासी पुरावा मिळत नाही. पण जातपडताळणीसाठी पूर्वीचा पुरावा मागितल्याने अडचणी येतात.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद पोवार, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल सांवत, आशुतोष कलकुटगी, सुरेश कलकुटगी, श्रीराम अलाकुंटे, उमेश वडर, संदीप अलाकुंटे, दीपक वडर, राकेश कलकुटगी, राजू कलकुटगी, संदीप पवार, गणेश सांळुखे, संतोष वडर, चंद्रकांत सरगर आदींनी नेतृत्व केले.
समाजाच्या प्रगतीत अडथळे
कलकुटगी म्हणाले, पुराव्याच्या अटीमुळे समाजाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. विद्यार्थी, नोकरदारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुराव्याची अट रद्द केली पाहिजे.