कोठून आलात; थांबा जरा कारण! सांगलीतील गृहनिर्माण सोसायट्यांत बाहेरच्यांना नो एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 01:34 PM2020-04-30T13:34:12+5:302020-04-30T13:36:24+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असतानाच, शहरातील गृहनिर्माण सोसायट्याही आपापल्यापरीने कोरोनाला थोपविण्यासाठी ...
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असतानाच, शहरातील गृहनिर्माण सोसायट्याही आपापल्यापरीने कोरोनाला थोपविण्यासाठी कार्यरत आहेत. सभासदांत जनजागृतीपासून निर्जंतुकीकरणापर्यंत सर्व खबरदारी सोसायट्यांनी घेतली आहे. जणू काही या सोसायट्यांनी स्वत:च क्वारंटाईन होऊन कोरोनाचा शिरकाव होऊ देणार नाही, असा निश्चय केला आहे.
महापालिका क्षेत्रात अगदी दहा फ्लॅटपासून ते दोनशे फ्लॅट रो बंगल्यापर्यंतच्या सोसायट्या आहेत. कोरोनाला दाराबाहेरच ठेवण्यासाठी या सोसायट्यांतील सभासद, पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. शासकीय आदेशाचे पालन करीत सोसायट्यांमध्ये विविध उपक्रमही राबविले आहेत.
सिद्धिविनायकपूरमचे उपाध्यक्ष उदय माळी म्हणाले की, सोसायटीत शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी राहत असल्याने शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन होते. सोसायटीने तातडीने मुख्य प्रवेशद्वार बंद केले. प्रत्येक सभासदांना कोरोनाची माहिती दिली. काहीजण बाहेरगावी जाऊन आल्याने त्यांची माहिती प्रशासनाला दिली. त्यांना होम क्वारंटाईन केले आहे.
स्वयंभू सृष्टीचे अध्यक्ष रणजित चव्हाण म्हणाले की, सोसायटीतील सभासदांची बैठक घेऊन कोरोनाबाबत जागृती केली. सोसायटीत दोन ते तीन फ्लॅटधारक मुंबईचे आहेत. त्यांनाही सांगलीला येऊ नका, असे कळविले. त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. घरकामासाठी येणाऱ्यांना प्रवेशबंदी केली.
राजयोग सोसायटीचे अध्यक्ष अनिल जाधव, डॉ. शीतल चौगुले म्हणाले की, सोसायटीचे प्रवेशद्वार प्रथम बंद केले. प्रत्येक फ्लॅटबाहेर साबण व पाण्याचे बकेट ठेवले आहे. घरात प्रवेश करताना पाण्याने पाय धुऊनच प्रवेश दिला जातो. लिफ्टमध्ये जाण्यापूर्वी हात सॅनिटायझर केले जात आहेत. भाजीपाला, दूध खरेदीसाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जात आहे.
रतनशीनगर, गिरनार, तुलसी, भारत कॉम्प्लेक्स या सोसायट्यांचे प्रवेशद्वार पूर्णपणे बंद केले. गुजराती सेवा समाजतर्फे प्रत्येक सदनिकेत मोफत मास्क व फिनेल दिले. सोसायटीत नियमितपणे औषध फवारणी केली जात आहे. सभासदांना सोशल डिस्टन्सिंग व मास्कची सक्ती केली आहे.
- दीपक शहा, सचिव, गुजराती सेवा समाज, सांगली
वृंदावन व्हिलाज्मध्ये घरकाम करणाºयांना बंदी केली आहे. प्रवेशद्वार बंद ठेवले आहे. भाजीपाला, दूध व इतर खरेदी प्रवेशद्वारावर करण्यास बंधन घातले आहे. प्रवेशद्वारावर तुरटी, मीठ, ब्लिचिंग पावडरचे द्रावण तयार केले असून ते दुचाकी, चारचाकीवर फवारणी करूनच वाहनांना प्रवेश दिला जातो. घरकामासाठी येणाºया महिलांना जीवनाश्यक वस्तूंचे कीट दिले आहे.
- अविनाश पाटणकर, अध्यक्ष, वृंदावन व्हिलाज्.