बाजार आवारात ओळखपत्राशिवाय प्रवेश बंदी, वैयक्तिक खरेदीदारास प्रवेश बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 10:28 AM2021-04-20T10:28:54+5:302021-04-20T10:33:02+5:30
CoronaVirus Sangli : कोविड -19 विषाणूचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाने दिनांक 15 एप्रिल 2021 पासून कोरोना ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लागू केले आहेत. बाजारात फळे व भाजीपाला खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात गर्दी होत असून त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे.
सांगली : कोविड -19 विषाणूचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाने दिनांक 15 एप्रिल 2021 पासून कोरोना ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लागू केले आहेत. बाजारात फळे व भाजीपाला खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात गर्दी होत असून त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे.
यास्तव विष्णुआण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात दिनांक 21 एप्रिल 2021 पासून फळ विक्रेते, व्यापारी व संबंधितांना ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. तसेच वैयक्तिक खरेदीदारास बाजार आवारात प्रवेश बंद करण्यात आले असल्याचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी सांगितले.
विष्णुआण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवार सांगली येथे गर्दी टाळण्यासाठी सर्व आडत्या/व्यापारी, होलसेल खरेदीदार, हमाल बांधव, दिवाणजी, तोलाईदार यांना बाजार समितीमार्फत ओळखपत्रे देण्याबाबत यापुर्वीच प्रशासनामार्फत सुचना देण्यात आल्या आहेत. बाजार समितीमार्फत ओळखपत्रे देणेचे काम अंतिम टप्प्यात आहे. ज्या व्यक्तींनी अद्याप ओळाखपत्रे घेतली नाहीत त्यांनी तात्काळ बाजार समितीशी संपर्क साधून ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावीत. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी केले आहे.
ओळखपत्र असल्याशिवाय विष्णुआण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवार, कोल्हापूर रोड सांगली येथे कोणालाही प्रवेश मिळणार नाही. तरी बाजार समितीशी संबधित असलेल्या सर्व घटकांनी ओळखपत्रांसाठी फळमार्केट येथील बाजार समितीचे कार्यालयाशी संपर्क साधावा व प्रशासनास सहकार्य करावे. तसेच किरकोळ ग्राहकांना फळ मार्केटमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही व फळ मार्केटमधील सर्व घटकांनी मास्क, सॅनीटायझर, सोशल डिस्टंसिंगचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.