महापालिका अर्थसंकल्पात पोकळ घोषणा नकोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:28 AM2021-04-01T04:28:37+5:302021-04-01T04:28:37+5:30
सांगली : महापालिकेच्या अर्थसंकल्पात गुंठेवारी व विस्तारित भागासाठी निधीची मागणी करताना नगरसेवकांचा संताप अनावर झाला. काँग्रेसचे अभिजित भोसले यांनी ...
सांगली : महापालिकेच्या अर्थसंकल्पात गुंठेवारी व विस्तारित भागासाठी निधीची मागणी करताना नगरसेवकांचा संताप अनावर झाला. काँग्रेसचे अभिजित भोसले यांनी गेल्या २३ वर्षांतील अर्थसंकल्पांचे वाभाडे काढत गुंठेवारीच्या विकासासाठी यंदा तरी भीक द्या, अशी आर्जव केली. आतापर्यंतचे अर्थसंकल्प केवळ कागदावर राहिले असून, पोकळ घोषणा बंद करा, अशी खरमरीत टीकाही केली.
स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे यांनी २०२१-२२ चा अर्थसंकल्प महासभेकडे सादर केला. त्यानंतर त्यावर नगरसेवकांनी चर्चा केली. यावेळी अभिजित भोसले यांनी गुंठेवारी व विस्तारित भागातील नागरिकांच्या समस्या मांडल्या. ते म्हणाले की, अर्थसंकल्पात नेहमीच शब्दांचा खेळ केला जातो. गेल्या २३ वर्षांत गुंठेवारी भागाचा विकास झालेला नाही. एकीकडे समतोल विकासाचा अर्थसंकल्प म्हणता, मग गुंठेवारीसाठी निधी का दिला जात नाही? आजही गुंठेवारी भागात पायाभूत सुविधा, रस्ते, गटारी नाहीत. रखरखत्या उन्हात महिला पाणी आणण्यासाठी धावपळ करतात. गावठाण भागातील नगरसेवकांना २५ लाखांचा निधी दिला जातो, तितकाच निधी गुंठेवारीतील नगरसेवकांना मिळतो. त्यातून एक रस्ता तरी होऊ शकतो का? यंदाच्या अर्थसंकल्पात तरी आम्हाला निधीची भीक द्यावी, अशी मागणी केली.
विजय घाडगे म्हणाले की, उपयोगकर्ता कर थांबविला पाहिजे, ते उत्पन्नाचे साधन नाही. कुपवाडला नेहमीच लहान भावासारखी वागणूक देऊ नका, कुपवाड सोसायटी चौक व विश्रामबाग चौकात भुयारी मार्ग करावा, कुपवाडमधील नाले बंदिस्त करावेत, अहिल्यानगर रस्त्यावरील पाण्याच्या निचऱ्यासाठी तरतूद करावी, अशी सूचना केली. आनंदा देवमाने यांनी मिरज कार्यालयाच्या दुरवस्थेचा प्रश्न मांडला. यावेळी सदस्यांनी भूसंपादनासाठी निधीची तरतूद करावी, जिल्हा नियोजनमधून मोठी कामे करावीत, सांगलीत इंदिरा गांधींच्या पुतळ्यासाठी निधी द्यावा, भाजी मंडई, दीनानाथ नाट्यगृह दुरूस्ती, कुपवाडसाठी स्वतंत्र २५ कोटी द्यावेत, आदी सूचना केल्या.
चौकट
भाजपकडून स्वागत, तर आघाडीकडून चिमटे
महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे, तर स्थायी सभापती भाजपचे आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाचे सर्वच भाजप सदस्यांनी जोरदार स्वागत केले. भाजपच्या संगीता खोत, अनारकली कुरणे, सविता मदने, स्वाती शिंदे, भारती दिगडे यांनी सभापती कोरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला; तर महाआघाडीकडून केवळ स्थायी सदस्यांचा विचार करून अर्थसंकल्प करण्यात आला आहे. गुंठेवारी व विस्तारित भागासाठी निधीची तरतूद नाही, उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ काय, असे मुद्दे मांडत चिमटे काढले.