साहित्यच नाही, बिबट्याला पकडायचे कसे..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 10:50 PM2018-12-09T22:50:30+5:302018-12-09T22:50:35+5:30
कोकरुड : बिबट्या अथवा अन्य कोणताही प्राणी पकडण्यासाठी सापळा अगर कसलेही साहित्य शिराळा येथे उपलब्ध नाही. वेळोवेळी मागणी करुनही ...
कोकरुड : बिबट्या अथवा अन्य कोणताही प्राणी पकडण्यासाठी सापळा अगर कसलेही साहित्य शिराळा येथे उपलब्ध नाही. वेळोवेळी मागणी करुनही हे साहित्य मिळत नसल्याची धक्कादायक माहिती शिराळा वन विभागाच्या वनरक्षक देवकी तहसीलदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शिराळा तालुक्यात चांदोली अभयारण्य असून या जंगलात अनेक हिंस्त्र प्राणी आहेत. यातील अनेक प्राणी जंगलाबाहेर येत असतात. सध्या तालुक्याच्या पश्चिम भागातील मणदूरपासून पावलेवाडीपर्यंत आणि उत्तर भागातील वाकुर्डे बुद्रुकपासून टाकवेपर्यंत अंदाजे ५ ते ७ बिबटे आणि त्यांची पिले आहेत. या बिबट्यांनी गेल्या दोन वर्षात मोठी दहशत निर्माण केली आहे. या दोन वर्षात शेळी, कुत्री, वासरे, रेडकू, गाय-म्हैस यांच्यावर हल्ला करुन शंभरपेक्षा जास्त जनावरे ठार केली आहेत. तितकीच जखमी झाली आहेत. चांदोली अभयारण्यातून हे प्राणी भक्ष्यासाठी बाहेर आले असून, डोंगरात शिकार करणारे हे बिबटे थेट मानवी वस्तीत येऊ लागले आहेत.
बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थांतून होत होती. शेतकऱ्यांचे गेल्या वर्षभरात मोठे आर्थिक नुकसान त्यांची जनावरे ठार झाल्याने झाले आहे, तरीही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
अधिकाºयांची हतबलता
याबाबत वन विभागाच्या कर्मचाºयांनी येळापूरपैकी वाण्याचीवाडी-लाडवाडी येथील लोकांना, सापळ्याचे भाडे कोण देणार?, असा सवाल केला होता. याबाबत वन विभागाच्या शिराळा येथील वनरक्षक देवकी तहसीलदार यांच्याकडे चौकशी केली असता त्या म्हणाल्या, बिबट्या अथवा अन्य कोणताही प्राणी पकडण्यासाठी कोणतेही साहित्य आणि सापळा नसल्याने तालुक्यात एवढ्या घटना घडूनही आम्हाला काही करता आलेले नाही. येथील कार्यालयास सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी सांगली कार्यालय येथे पाठपुरावा केला आहे. मात्र अजूनही साहित्य उपलब्ध न झाल्याने आमची कारवाई ठप्प झाली आहे.
केवळ बघ्याची भूमिका
वाघ, बिबट्या, तरस आदी प्राणी एखाद्या गावात आलाच आणि त्याला पकडायचे झाल्यास वन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांना केवळ बघतच रहावे लागणार, एवढे नक्की.