शब्दात कितीही गोडवा असला तरी, त्यामागची भावना तितकीच महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:03 PM2019-01-20T23:03:49+5:302019-01-20T23:03:55+5:30
सांगली : शब्दांना काही अर्थ असतो का? कारण शब्दकोशातही देण्यात आलेले शब्दांचे अर्थ खूपच सीमित स्वरूपाचे असतात, असे भाषाशास्त्राची ...
सांगली : शब्दांना काही अर्थ असतो का? कारण शब्दकोशातही देण्यात आलेले शब्दांचे अर्थ खूपच सीमित स्वरूपाचे असतात, असे भाषाशास्त्राची अभ्यासक म्हणून नेहमीच वाटते. त्यामुळे शब्द कितीही गोड असले तरी त्यामागची भावना तितकीच महत्त्वाची असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
भवाळकर म्हणाल्या, भाषेतील गोडवा व भावनेतील गोडवा महत्त्वाचा ठरत असतो. कारण केवळ शब्दांना अर्थ कधीच नसतो, तर तो तुम्ही उच्चारता कसे हे महत्त्वाचे असते. शब्दकोशातही त्याचे अर्थ खूपच सीमित स्वरूपात असल्याचे एक भाषाशास्त्राची अभ्यासक म्हणून नेहमीच वाटते.
भाषेतील गोडवाच अनुभवायचा झाल्यास शब्दातील उच्चारावरही लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. भाषेतील हेलकावे, आरोह, अवरोह, स्वराघात, बलाघात म्हणजेच कोणत्या शब्दावर तुम्ही जोर देऊन बोलता, यावरही ते अवलंबून असते. उदाहरणच द्यायचे झाले तर शब्दकोशात शहाणा या शब्दाचा वाईट अर्थ आहे, असे कुणी म्हणेल का? पण एखादा जरा जास्तच बोलायला लागला, तर दुसरा लगेच त्याला फार शहाणे आहात, असे म्हणतो.
म्हणजेच त्याला मूर्खच म्हणायचे असते. त्यामुळे शब्द जरी सकारात्मक वापरला तरी, त्याचे उच्चारणे खूप काही सांगून जाते. खेकसून बोलणे, हळुवार, सावकाश, टोमणे मारत बोलणे यातून हेच दिसून येते. आवाजात जरी कितीही मृदुपणा असला तरी, शब्दातील लागटपणा लगेच समोरच्या व्यक्तीला कळतो. त्यामुळे भाषेचे, शब्दांचे प्रक्षेपण व त्याच्या संदर्भातून तुम्ही किती गोड, सकारात्मक बोलता, हे दिसून येते.
माणसे जोडण्याची, हृदये जोडण्याची प्रक्रिया ही चांगल्यारितीने होण्यासाठी आपले गोड शब्दच कारणीभूत ठरतात. आवाजातील पट्टी महत्त्वाची असते. अनेकजण साधे बोलले तरी खेकसत असल्यासारखे बोलतात.
आपण किती माणसांशी संवाद साधतो व त्यावेळी आपले शब्द किती प्रभावी आहेत, यावरही लक्ष दिले गेले पाहिजे. दोन माणसांच्या समोर असणाऱ्या आवाजाची पट्टी व एखाद्या सभेतील पट्टी यात बदल हवाच व शब्दातील बदलही तितकाच प्रभावी असेल, तरच गोडी निर्माण होते.