औषधांसाठी पैसे नाहीत, पण जी-२० परिषदेवर साडे चार हजार कोटी खर्च केले; जयंत पाटील यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र
By अविनाश कोळी | Published: October 7, 2023 07:38 PM2023-10-07T19:38:53+5:302023-10-07T19:43:34+5:30
व्यक्ती स्वातंत्र्यावरील गदा घातक
इस्लामपूर : राज्यात औषधांच्या तुटवड्याने रुग्णांचा मृत्यू झाला. सरकारकडे अंगणवाडी शिक्षिकांचे पगार करायला पैसे नाहीत. अपंग, वृध्द, विधवा महिला, निराधार व्यक्तींना वेळेवर पेन्शनचे पैसे मिळत नाहीत. मात्र नरेंद्र मोदींनी जी २० परिषदेवर ४ हजार ५०० कोटी रुपये खर्च केले आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
साखराळे (ता.वाळवा) येथे ''एक तास राष्ट्रवादीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी'' या उपक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, आनंदराव पाटील, सरपंच सुजाता डांगे, उपसरपंच बाबुराव पाटील, शिवाजी डांगे, भास्करराव पाटील, अलका माने, रामराजे पाटील, शैलेंद्र सुर्यवंशी प्रमुख उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, आमचे मित्र चंद्रशेखर बावनकुळे इस्लामपूरमध्ये माईक घेऊन घरोघरी फिरले. मोदींची लोकप्रियता कमी होत असल्याने असे उपक्रम त्यांना राबवावे लागत आहेत. सरकारे येतात आणि जातात, मात्र सध्या आपल्या देशात व्यक्ती स्वातंत्र्यावर जी गदा आणली जात आहे,ती देशासाठी घातक आहे. देशात महागाईने कळस गाठला असून सामान्य माणूस या महागाईने होरपळला जात आहे. सध्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात सामान्य माणसांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे.
नांदेडच्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागणे, हे दुर्दैवी आहे. आमच्या काळात आम्ही औषध खरेदीचे अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. या सरकारने ते अधिकार आपल्याकडे घेतले होते. आता आम्ही बोलू लागल्यावर अधिकाऱ्यांना औषध खरेदीचे अधिकार दिल्याचा नवा आदेश काढला आहे. सध्या निवडणूका जवळ येतील,तशा विविध सवलती जाहीर केल्या जात आहेत. मात्र जनता आता फसणार नाही.