महापालिका निवडणूक नव्हे मिनी आमदारकीच!
By admin | Published: June 3, 2016 12:11 AM2016-06-03T00:11:11+5:302016-06-03T00:11:11+5:30
फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणारी महापालिका निवडणूक राज्य सरकारने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सांगली : गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या सांगलीकरांना गुरुवारी सायंकाळी वळवाने दिलासा दिला. सुमारे अर्धा तास पडलेल्या जोरदार पावसाने सांगलीला चिंब भिजविले. शहरातील प्रमुख मार्गांवर, मंडईत तसेच सखल भागात पाणी साचून राहिले होते. जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, कवठेमहांकाळ, तासगाव, कडेगाव तालुक्यांनाही वळवाने झोडपून काढले.जिल्ह्यातील काही भागात वळिवाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी वर्तविला होता. त्यानुसार गुरुवारी विजांच्या कडकडाटासह वळिवाच्या पावसाने सांगली शहरात हजेरी लावली. सायंकाळी वातावरण ढगाळ बनले होते. सहा वाजता पावसाचा शिडकाव झाला. त्यानंतर पावणेसात वाजण्याच्या सुमारास पावसाने जोर धरला. अर्धा तास पावसाने हजेरी लावून नागरिकांना दिलासा दिला. उकाड्याने त्रस्त झालेल्या अनेकांनी या पावसात भिजण्याचा आनंद लुटला. जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट घेऊन पावसाने हजेरी लावली. सांगली शहराच्या सखल भागात काही काळ पाणी साचून राहिले होते. सांगलीच्या राम मंदिर, स्टेशन रोड, एसटी स्टँड परिसर, सिव्हिल हॉस्पिटल चौक याठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. शिवाजी मंडईतील विक्रेत्यांची पावसामुळे पळापळ झाली. मंडईतही नेहमीप्रमाणे पावसाच्या पाण्याने काही काळ मुक्काम केला. गुरुवारीही दिवसभर उकाडा जाणवत होता. सायंकाळी झालेल्या पावसाने तापमानात घट झाल्याचे जाणवत होते. जिल्ह्याचे सरासरी तापमान गुरुवारी ३६.४ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. किमान तापमानातही घट झाली आहे.
मिरज : मिरज शहर व परिसरात आज सायंकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. रेल्वेस्थानक, मंगल टॉकीज परिसरात व अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. नागरिकांची व वाहनधारकांची पाण्यातूनच ये-जा सुरू होती. पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शहरातील अनेक भागात अंधार होता. गुंठेवारी भागात चिखलाने दैना उडाली होती. हायस्कूल रस्त्यावर टेलिफोनसाठी रस्ता खोदण्यात आल्याने अनेक दुचाकी व चारचाकी वाहने खड्ड्यात अडकली होती. मिरजेसह ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला.
पलूस : विजांच्या कडकडाटासह पलूस व परिसरात गुरुवारी तीनच्या सुमारास तासभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. अंकलखोप, संतगाव, सूर्यगावसह आमणापूर परिसरात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे काही प्रमाणात पिकांना पाणी मिळाले आहे.
आष्टा : आष्टा व परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. आष्टा, बागणी, बावची, नागाव, पोखर्णी या भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
तासगाव : शहरासह तालुक्याच्या पूर्व ग्रामीण भागाला गुरुवारी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तासगाव शहरासह तालुक्याच्या लोढे, बस्तवडे, आरवडे, वायफले, डोंगरसोनी, सावळज, यमगरवाडी, कवठेएकंद, बोरगाव आदी भागात पावसाने हजेरी लावली. (वार्ताहर)
कवठेमहांकाळमध्ये मुसळधार : जोराचा वारा
कवठेमहांकाळ : तालुक्याला गुरुवारी मुसळधार पावसाने झोडपले. विजेचा कडकडाट, मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पाऊस सुमारे एक तास कोसळला. सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. सायंकाळी साडेसहाला विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे एक तास विजेचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस सुरू होता. कवठेमहांकाळ शहरात या पावसामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी झाली. भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते यांची तारांबळ उडाली. तालुक्यातील रांजणी, ढालगाव, कुची, करोली (टी), देशिंग, अलकूड (एम), घाटनांद्रे, बोरगाव, मळणगाव, नागज, दुधेभावी या सर्वच परिसरात जोरदार पाऊस पडला. रात्री उशिरापर्यंत अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. तसेच विजेचा कडकडाट सुरु होता.
देशिंग : कवठेमहांकाळ तालुक्याच्या पश्चिम भागातील देशिंग, खरशिंग, हरोली, बनेवाडी परिसरात विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सायंकाळी सहाच्यादरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. तासभर पडलेल्या पावसाने परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. या परिसराला सतत पावसाने हुलकावणी दिली असल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. द्राक्ष, डाळिंब, ऊस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले होते.वादळी वाऱ्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता.