पाणी कोणा एकट्याच्या बापाचे नाही!
By admin | Published: January 12, 2015 10:55 PM2015-01-12T22:55:52+5:302015-01-13T00:18:42+5:30
दीपकआबा साळुंखे-पाटील : ‘म्हैसाळ’च्या पाण्याबाबत सांगलीत बैठक
सांगली : सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यातील साडेचार हजार हेक्टरसाठी म्हैसाळ योजनेचे पाणी मिळावे, याकरिता शासनाने खास तरतूद करून पाणी सोडले आहे, मात्र मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील लोक सांगोल्यापर्यंत पाणीच पोहोचू देत नाहीत. कालवे फोडून पाणी अडवत आहेत. शेगाव (ता. जत) येथील तलाव तीन वेळा भरून घेतल्यानंतरही पुढे पाणी सोडत नाहीत. पाणी कोणा एकट्याच्या बापाचे नाही, ते सर्वांना समानच मिळाले पाहिजे, असा इशारा सांगोला तालुक्याचे नेते आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना दिला. म्हैसाळ योजनेच्या पाणीप्रश्नावर सांगोला, जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील पदाधिकारी, अधिकाऱ्यांची सांगलीतील वारणाली येथे आज (सोमवारी) बैठक झाली. या बैठकीस आमदार सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, आ.दीपकआबा पाटील, कार्यकारी अभियंता एम. एच. धुळे, कार्यकारी अभियंता सचिन पवार आदी उपस्थित होते. आ. साळुंखे-पाटील म्हणाले की, म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी सर्व तालुक्यांना आणि क्षेत्राला समान मिळाले पाहिजे, यासाठी सांगोला तालुक्याने शासनाशी लढा दिला आहे. म्हैसाळ योजना सुुरू होऊन चार ते पाच वर्षे झाली, तरीही मिरज, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातच पाणी फिरत आहे. अद्याप सांगोला तालुक्यापर्यंत ते पोहोचलेले नाही. सध्या सांगोला तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर पारे तलाव आणि मेथवडे बंधारा भरण्यासाठी म्हैसाळचे पाणी सोडले आहे. परंतु, मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातून पुढे पाणी सोडलेच जात नाही. शेगाव तलाव तीन ते चार वेळा भरल्यानंतरही म्हैसाळ योजनेचे कालवे फोडून पाणी अडवले जात आहे. यामुळे सांगोला तालुक्यापर्यंत पाणीच पोहोचत नाही. आमच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, ते कोणा एकट्याच्या बापाचे नाही, अशी विनंती करून सांगा. एवढ्यावर जर कुणी थांबणार नसेल, तर कायद्याचा आधार घेऊन दोषींवर फौजदारी कारवाई करावी.
फौजदारी कारवाईच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आ. जगताप, आ. खाडे यांनीही म्हैसाळ योजनेचे कालवे फोडणाऱ्यांचा अधिकाऱ्यांनी शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईची सूचना केली. सांगोला तालुक्यातील तलाव भरल्यानंतर जत, कवठेमहांकाळ आणि शेवटी मिरज तालुक्यास पाणी द्यावे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
कोण कालवे फोडत आहे, याची अधिकारी, कर्मचाऱ्यांना कल्पना आहे. त्यांनी दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व पंप चालू ठेवावेत, अशी सूचना जगताप यांनी केली. (प्रतिनिधी)
तीस टक्के पाणी कर्नाटकला
म्हैसाळचे पाणी मिळत नसल्यामुळे जत आणि सांगोला तालुक्यात संघर्ष पेटला आहे. पाणी मिळविण्यासाठी तेथील शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पाणीप्रश्नावर दोन्ही तालुक्यातील नेत्यांमधील संघर्ष पेटला असतानाच, आमदार खाडे यांनी म्हैसाळ योजनेतील ३० टक्के पाणी कर्नाटकाला वाहून जात असल्याचा आरोप करून बैठकीतील हवाच काढून घेतली. अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय कारभाराचेही त्यांनी वाभाडे काढले. खाडेंच्या विधानानंतर दीपकआबांनी तर डोक्यालाच हात लावला. ‘अहो, आम्ही घोटभर पाण्यासाठी जीव तोडून ओरडत आहोत आणि अधिकारी मात्र योजनेतील ३० टक्के पाणी कर्नाटकाला सोडत आहेत, ही गंभीर बाब आहे,’ असे सांगून, पाण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली.
मराठवाडा, विदर्भात पाणी मोजमाप आणि पाणीपट्टी आकारणीमधील अनेक अधिकारी, कर्मचारी बसून पगार घेत आहेत. त्यांना तेथे कामही नसल्यामुळे तेथील कार्यालये म्हैसाळ योजनेकडे वर्ग करून, पाणीपट्टी वसुलीसाठी गती द्यावी, अशी सूचना आ. साळुंखे-पाटील, आ. जगताप यांनी अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार तसा प्रस्ताव करून शासनाकडे पाठविण्याचे ठरले.
निधीसाठी पंतप्रधानांना भेटणार
म्हैसाळ योजनेसाठी निधी मिळालेला नाही. या योजनेच्या अपूर्ण कामांकरिता शासनाने निधी द्यावा, या मागणीसाठी जत, सांगोला, कवठेमहांकाळ, मिरज आणि तासगाव तालुक्यातील आमदार, ज्येष्ठ लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची बैठक घडवून आणू. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन, दुष्काळी तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना असल्याने निधी द्यावा, अशी मागणी करू, असे मत दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केले.