संविधान कोणीही बदलू शकणार नाही - अमित शाह; सांगली, शिराळा, कऱ्हाडमध्ये प्रचार सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 12:15 PM2024-11-09T12:15:20+5:302024-11-09T12:16:52+5:30
'महाराष्ट्रावर पवार आणि कंपनीने अन्याय केला'
सांगली : आरक्षणाला आम्ही हात लावू देणार नाही. अनुसूचित जाती, इतर मागास यांचे आरक्षण जसेच्या तसे राहील. कोणीही माईचा लाल आला, तरी संविधान बदलणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ, सत्यजित देशमुख, अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांच्या सांगली, शिराळा, कऱ्हाड येथे सभा झाल्या.
सांगली येथील सभेत शाह म्हणाले, संविधान हा प्रचाराचा मुद्दा नसून विश्वासाचा आहे. विरोधक संविधानाच्या नावावर मते मागतात, कारस्थाने रचतात. महाराष्ट्रातील एका सभेत संविधानाच्या कोऱ्याच प्रती वाटल्या. राहुल गांधी यांनी संविधानाचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. संविधानाला हातात घेऊन संसदेत शपथ घेतली, ते तरी असली होते की नकली? हे त्यांनी देशाला सांगावे. नकली संविधान दाखविणाऱ्यांवर भरवसा कसा करायचा? नुकतेच ते इंग्लंडला गेले होते, तेव्हा देशाला आरक्षणाची गरज नसल्याचे म्हणाले. पण संविधानाला हात लावण्याची कोणाचीच हिम्मत नाही. आरक्षणाला आम्ही हात लावू देणार नाही. अनुसूचित जाती, इतर मागास यांचे आरक्षण जसेच्या तसे राहील.
शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डाला देण्याचा डाव
शिराळा: वोट बँका जपण्यासाठी वक्फ बोर्डाला पाठबळ देण्याचे काम काँग्रेस नेत्यांनी केले. आघाडीचे सरकार चुकून जरी राज्यात आले, तर शेतकऱ्यांच्या जमिनी या बोर्डाला देण्याचे काम ते करतील, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिराळा येथे केली.
चार पिढ्या आल्या, तरी कलम पुन्हा लागू हाेणार नाही
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर काँग्रेस व आघाडीतील नेत्यांचा विरोध झाला. हे कलम पुन्हा आणण्याचा त्यांचा विचार आहे. शरद पवारही त्यामध्ये आहेत. पण, शरद पवारांच्या अजून चार पिढ्या जरी आल्या, तरी आम्ही हे कलम पुन्हा लागू देणार नाही, असे शाह म्हणाले.
महाराष्ट्रावर पवार आणि कंपनीने अन्याय केला !
कऱ्हाड : ‘माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार हे यूपीए सरकारच्या काळात केंद्रामध्ये मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्रासाठी केवळ १ लाख ९१ हजार कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र, मोदी सरकारने दहा वर्षांतच १० लाख १५ हजार ८९० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. पवार आणि कंपनीने महाराष्ट्रावर नेहमी अन्याय केला असून ते या वयातही खोटे बोलतात,’ अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कऱ्हाड येथे केली.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचे संकेत
शाह म्हणाले की, मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना निवडून आणायचे आहे, अशी इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार असल्याने राज्यातही युतीचे सरकार आले तर महाराष्ट्र देशातील क्रमांक एक राज्य बनेल. यासाठी महायुतीला व देवेंद्र यांना साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शाह यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाली. स्थानिक उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन करताना त्यांनी राज्यासाठी फडणवीस यांना साथ देण्याचे आवाहन केल्यामुळे फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचे संकेत शाह यांनी दिल्याचा अंदाज बांधला जात आहे.
समर्थ रामदास यांचा शिवरायांना पाठिंबा
अमित शाह म्हणाले की, समर्थ रामदास यांचे पाय या शिराळ्याच्या भूमीला लागले आहेत. समर्थ रामदास यांनी गुलामीच्या काळात महाराष्ट्रातील युवकांना एकत्र करून शिवाजी महाराज यांना पाठिंबा देण्याचे काम केले. त्या समर्थ रामदास यांना मी नमन करतो.