अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाच्या कारवाईतून कोणीही सुटणार नाही : केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:43 PM2017-11-12T23:43:03+5:302017-11-12T23:51:31+5:30
अनिकेत कोथळे याच्या कुटुंबाला दोन दिवसात शासकीय मदत दिली जाईल. पण या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मग तो लहान असो अथवा मोठा, कारवाईतून कोणीही सुटणार नाही, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.
सांगली : पोलिस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबाला दोन दिवसात शासकीय मदत दिली जाईल. पण या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मग तो लहान असो अथवा मोठा, कारवाईतून कोणीही सुटणार नाही, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी उपाययोजना केल्या जातील, पोलिस यंत्रणेतील दोष सुधारले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अनिकेतच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या कुटुंबास मदत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. ते स्वत: दोन दिवसात मदतीची घोषणा करतील. प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या सात पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.
सांगलीत घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी राज्यस्तरावरील पोलिस अधिकाºयांशी चर्चा करुन उपाययोजना केल्या जातील. आरोपीचा कोठडीत मृत्यू झाला की, हा तपास सीआयडीकडेच जातो. सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु आहे.
केसरकर म्हणाले, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. यानिमित्ताने सांगली पोलिस दलाच्या यंत्रणेत दोष असल्याचे दिसून येते. हे दोष सुधारले पाहिजेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाºयाची नियुक्ती करुन पोलिस प्रशासनातील त्रुटी दूर केल्या जातील. अटक केलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी शासनातर्फे न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली जाईल.
सांगलीकरांनीही तपासात सहकार्य करावे. शहरात शांतता नांदावी, यासाठी सहकार्य करावे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या खटल्यात नियुक्ती करण्यासाठी माझा प्रयत्न राहील. या प्रकरणानंतर सांगलीकरांनी दाखविलेल्या शांततेबद्दल मी आभार मानतो. सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी पुकारलेला सांगली बंद मागे घ्यावा, अशी माझी विनंती आहे.
केसरकर पुढे म्हणाले, पुढील काही दिवसात हा तपास वेगाने झालेला दिसेल. मुंबईत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत तपासाचा आढावा घेतला जाईल. झाकीर पट्टेवाले या झिरो पोलिसालाही अटक केल्याचे समजले. पोलिस दलात झिरो पोलिस लागतातच कशासाठी? यापुढे झिरो पोलिस दिसल्यास खपवून घेतले जाणार नाही.
अनिकेत परत येणार नाही...
केसरकर म्हणाले, अनिकेतचे कुटुंब दु:खात आहे. आर्थिक मदत देऊन या कुटुंबाचे दु:ख दूर होणार नाही. आज या कुटुंबाने कर्ता माणूस गमावला आहे. तो परत येणार नाही. यातील आरोपींना शिक्षा झाली तरच या कुटुंबाला समाधान वाटेल. यासाठी शासनाचे प्रयत्न असतील.
कारवाई झालेली दिसेल
केसरकर म्हणाले, अनिकेत कोथळे प्रकरणात ज्या काही तक्रारी व संशय व्यक्त करण्यात आला आहे, त्याची चौकशी केली जाईल. चौकशीत दोषी आढळलेला लहान असो अथवा मोठा, कारवाईतून कोणीही सुटणार नाही. निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेला कोणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्याच्यावरही कडक कारवाई केली जाईल.
...तर नीतेश राणेंची चौकशी
खून करुन गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावली जात असल्याचा आरोप नीतेश राणे यांनी केला आहे. या प्रश्नावर केसरकर म्हणाले, नीतेश राणे हे वयाने आणि अनुभवाने लहान आहेत. त्यांची बौद्धिक पातळी काय, हे बघावे लागेल. अनिकेत प्रकरणात वक्तव्य करणाºया राणे यांच्याकडे जर काही माहिती असेल, तर त्यांचीही चौकशी करावी लागेल.