Sangli: आई-बाबा तर नाहीत..मॅडम तुम्हीच सांगा माझा वाढदिवस कधी?; शिक्षिकेने शोधली तारीख अन् शाळेतच कापला केक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 11:50 AM2023-11-08T11:50:34+5:302023-11-08T11:51:02+5:30

चिमुकल्याचा चेहरा फुलला

No parents..Madam tell me when is my birthday; The teacher found the date and cut the cake in the school itself in sangli | Sangli: आई-बाबा तर नाहीत..मॅडम तुम्हीच सांगा माझा वाढदिवस कधी?; शिक्षिकेने शोधली तारीख अन् शाळेतच कापला केक

Sangli: आई-बाबा तर नाहीत..मॅडम तुम्हीच सांगा माझा वाढदिवस कधी?; शिक्षिकेने शोधली तारीख अन् शाळेतच कापला केक

प्रदीप पोतदार

कवठेएकंद (सांगली) : मुलांचं भावविश्व आई-वडिलांच्या प्रेमानं फुलत असतं...पण, आयुष्य फुलण्याआधीच मातृ-पितृछत्र हरपले तर प्रेमाची एक मोठी पोकळी त्यांच्या विश्वात तयार होते. अस्वस्थ मनाला अनेक प्रश्न सतावतात. कवठेएकंद येथील शाळेतील अशाच एका मुलाने अन्य मुलांचे वाढदिवस साजरे होताना सवाल केला, मॅडम, माझा वाढदिवस कधी असतो? काळजात कालवाकालव झाली खरी, पण शिक्षिकेने मायेचे पंख पसरत त्या मुलाला वाढदिवसाची तारीख मिळवून देत शाळेतच मोठ्याने वाढदिवस साजरा केला.

रिहान करण घाडगे या पहिलीतील मुलाची कहाणी वेदनादायी आहे. गरिबीच्या चटक्यांनी त्रस्त झालेल्या कुटुंबातील त्याचा जन्मापासूनचा प्रवास खडतरच राहिला. दीड वर्षांचा असताना त्याच्या आई-वडिलांचे आकस्मिक निधन झाले. आजीने त्याचा सांभाळ केला. कोमजलेले त्याचे आयुष्य शाळेत पुन्हा फुलायला लागले तरीही सभोवतालच्या मुलांचे आयुष्य पाहुन त्याच्या भाबड्या मनात प्रश्नांनी घर केले. इतरांचे वाढदिवस पाहून तो मॅडमना वारंवार विचारायचा, मॅडम, माझा वाढदिवस कधी?

विद्यार्थ्यांशी लळा असणाऱ्या वर्गशिक्षिका नूतन परीट यांनी त्याचा वाढदिवस साजरा करायच ठरवलं. अंगणवाडीत जाऊन त्याची जन्मतारीख शोधली व ६ नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस शाळेच्या वतीने साजरा केला. मुख्याध्यापकांनी रिहानला कपडे आणले. येथील कापड व्यावसायिक पाटील यांनीही गिफ्ट म्हणून आणखी एक ड्रेस दिला. कवठेएकंद जिल्हा परिषद शाळा नं. १ मध्ये शिकणाऱ्या रिहानचा वाढदिवस ६ नोव्हेंबरला सोमवारी थाटात साजरा करण्यात आला.

शाळेत केक कापून रिहानला शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आले. या आपुलकीच्या वाढदिवसाला संतोष आठविले, जावेद जमादार, तानाजी शिरतोडे, मुख्याध्यापक राजेंद्र सागरे, उपशिक्षक विशाल खाडे तसेच कापड व्यावसायिक पूनम पाटील उपस्थित होते.

चिमुकल्याचा चेहरा फुलला

वाढदिवस साजरा करण्याचे स्वप्न सत्यात उतरताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. सतावणाऱ्या प्रश्नाचे उत्तर त्याला गवसले अन् त्याच्या आनंदाने शिक्षकांसह शाळेचे प्रांगणही आनंदाने फुलून गेले.

Web Title: No parents..Madam tell me when is my birthday; The teacher found the date and cut the cake in the school itself in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.