‘आरक्षण नाही, तर मतदान नाही’; ५० टक्के ओबीसी कोट्यातूनच आरक्षणाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 08:47 AM2023-09-18T08:47:53+5:302023-09-18T08:48:46+5:30
सांगलीत मराठा क्रांती माेर्चा, पोलिस बंदोबस्त असला तरी आंदोलकांच्या स्वयंशिस्तीमुळे पोलिसांवर ताण पडला नाही.
सांगली : ‘अरे कोण म्हणतंय देत न्हाई’ ‘मावळं आम्ही, वादळ आम्ही’, ‘आरक्षण नाही, तर मतदान नाही’ असे फलक हाती घेत, ‘एक मराठा, लाख मराठा’चा गजर करीत रविवारी सांगलीत भर पावसात मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला.
आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त करीत आणखी मोठे आंदोलन उभारण्याचा तसेच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
पन्नास टक्के ओबीसी कोट्यातूनच मराठा समाजाला आरक्षण हवे, या मागणीसाठी रविवारी सांगलीत ‘मराठा क्रांती मोर्चा’ काढण्यात आला. सांगलीच्या विश्रामबाग चौकापासून कर्मवीर भाऊराव पाटील चौकापर्यंतचा संपूर्ण रस्ता भगव्या रंगात न्हाऊन गेला होता.
शिस्तबद्ध मोर्चा
काटेकोर नियोजन, स्वयंसेवकांनी निर्माण केलेली शिस्त व त्याचे आंदोलकांनी केलेले पालन यामुळे मोर्चा अत्यंत शिस्तबद्धरित्या पार पडला. पोलिस बंदोबस्त असला तरी आंदोलकांच्या स्वयंशिस्तीमुळे पोलिसांवर ताण पडला नाही.
चोंडी उपोषणाचा बारावा दिवस
जामखेड (जि. अहमदनगर) : धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ६ सप्टेंबरपासून चोंडी येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणाला बारा दिवस उलटले आहेत. राज्यभरातील समाजबांधव व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. लोकप्रतिनीधींनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली.