Sangli: कृष्णेचे हलाहल पचविणार की, पिढ्यान् पिढ्या विकारग्रस्त करणार?

By अविनाश कोळी | Published: February 19, 2024 07:23 PM2024-02-19T19:23:21+5:302024-02-19T19:23:38+5:30

नदीकाठच्या मंदिरांचा परिसर पवित्र झाला, मात्र नदी मेली अन् नदीचे पावित्र्य गेले

No system has been implemented to solve the pollution of Krishna river in Sangli | Sangli: कृष्णेचे हलाहल पचविणार की, पिढ्यान् पिढ्या विकारग्रस्त करणार?

Sangli: कृष्णेचे हलाहल पचविणार की, पिढ्यान् पिढ्या विकारग्रस्त करणार?

अविनाश कोळी

सांगली : पात्रातून बाहेर पडत कृष्णा नदी महापुराचे रुप धारण करुन नागरी वस्त्यांमध्ये शिरते. जेव्हा ती शांत असते तेव्हा सांडपाण्यातून तिच्या उदरात टाकलेले विष ती नागरिकांनाच परत करीत असते. महापूर दरवर्षी येत नसला तरी वर्षानुवर्षाचा अन् दररोजचा विषप्रयोग सुरुच आहे. भगवान शंकराने समुद्रमंथनातील हालाहल पचविले, पण कृष्णेचे हे हलाहल सामान्यांना पचणारे नव्हे तर पुढच्या अनेक पिढ्यांना विकारग्रस्त बनविणारे ठरणार आहे. महापूर रोखण्यासाठी जागतिक बँक धावली, पण प्रदूषणाचा फास सोडविण्यासाठी एकही यंत्रणा नाही राबली, ही शोकांतिका आहे.

खळाळत वाहणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्याचा मधूर आवाज, जलचरांचा मूक्तविहार असा निसर्गाचा रम्य नजारा आता केव्हाचाच नाहीसा झालाय. कधी काळवंडलेले दुर्गंधीयुक्त पाणी खळाळत वाहताना तर कधी मृत माशांचा खच पाहताना नदीकाठ आता भकास व उदासवाणा वाटतोय. आहे या परिस्थितीत रम्यपणाचा अनुभव घेणाऱ्या सकारात्मक मानसिकतेचे प्रशासन याला अपवाद आहे.

नदीच्या पात्रात बांधकामांच्या माध्यमातून झालेले अतिक्रमण व नदीच्या पाण्यात सोडले जाणारे सांडपाणी, कारखान्यांचे केमिकल कृष्णा नदी साभार परत करीत आहे. कृष्णा नदीला कोयना धरणाचा आधार असल्याने किमान पाण्याच्या पुरवठ्याचा प्रश्न नदीकाठच्या गावांत किंवा सांगली शहरांना सतावला नाही. गैरनियोजनामुळे पात्र कोरडे पडले तर नागरिकांच्या तोंडचे पाणी पळते. मात्र, या पाण्यातून आता मिनरलऐवजी प्रदूषणाचा डोस दिला जातोय. कृष्णा नदीने काठच्या गावांना समृद्धीचे वरदान दिले मात्र, नागरिकांनी तिला सांडपाण्यातून घाण केले.

पाण्याचा गोंधळ न संपणारा

कृष्णेचे पाणी प्रदूषित झाल्यानंतर वारणा किंवा चांदोली धरणाचा पर्याय समोर आला आहे. यातून स्वच्छ पाणीपुरवठा होईलही, मात्र ज्या कृष्णेने सांगलीकरांची इतकी वर्षे तहान भागविली, समृद्धी दिली, जलचरांना जपले त्या कृष्णेला प्रदूषणाच्या विळख्यात सोडून पाठ फिरवणे ही माणुसकी नाही. आजाराने ग्रस्त आईला सोडून अन्य घरांमध्ये ममत्त्वाचा शोध घेणे उचित ठरेल का, असाही प्रश्न आहे.

काठ सजला, नदी मेली

गेल्या कित्येक वर्षात सांगली, हरीपूर व जिल्ह्याच्या अन्य भागात नदीचा काठ स्थापत्यकलेने सजविण्यात आला. विद्युत रोषणाईने पूल उजळविण्यात आले. नदीकाठच्या मंदिरांचा परिसर पवित्र झाला, मात्र नदी मेली अन् नदीचे पावित्र्य गेले, याच्या वेदना कोणाला होताना दिसत नाही. नदीचे देवत्त्व कोणाला का दिसत नाही, हा सवालही अस्वस्थ करतो.

Web Title: No system has been implemented to solve the pollution of Krishna river in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.