लस नाही तर शाळाही नाही; जिल्ह्यात ५५ टक्के विद्यार्थी अद्याप शाळेबाहेरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:24 AM2021-01-08T05:24:33+5:302021-01-08T05:24:33+5:30
सांगली : लॉकडाऊननंतर नववी ते बारावीचे वर्ग सुरू होऊन एक महिना झाल्यानंतर शाळांमधील उपस्थितीचा आढावा घेतला असता ती खूपच ...
सांगली : लॉकडाऊननंतर नववी ते बारावीचे वर्ग सुरू होऊन एक महिना झाल्यानंतर शाळांमधील उपस्थितीचा आढावा घेतला असता ती खूपच समाधानकारक असल्याचे आढळले आहे. पहिल्या पंधरवड्यात तीस ते पस्तीस टक्क्यांपर्यंत थबकलेली उपस्थिती एव्हाना नव्वद टक्क्यांवर गेली आहे. या काळात एकही विद्यार्थी नव्याने कोरोना संक्रमित झाला नाही, हीदेखील दिलासा देणारी बाब ठरली आहे.
जिल्ह्यातील ७५० पैकी ७०१ शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. एकूण पटापैकी ५० टक्के विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात, तर उर्वरित घरातून ऑनलाईन स्वरुपात शिक्षण घेत आहेत. बहुतांश शाळांमध्ये खोल्या शिल्लक असल्याने तेथे शंभर टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाविषयक सॅनिटायजर, सोशल डिस्टन्सिंग, आदी उपाय मात्र सक्तीचे आहेत. सुदैवाने याचा फायदा झाल्याचे निरीक्षण आहे. एकही संक्रमित नाही.
एकही विद्यार्थी संक्रमित नाही
महिनाभरात जिल्ह्यात एकही विद्यार्थी कोरोना संक्रमित झालेला नाही. जत तालुक्यात एक शिक्षक बाहेरून संसर्गग्रस्त झाल्याचे आढळले होते, ती शाळा काही दिवस बंद ठेवण्यची सूचना देण्यात आली. बेडगमध्ये पहिल्याच दिवशी कोरोनाबाधित शिक्षक आले होते. तेथेही शाळा चौदा दिवस बंद ठेवण्यात आली. पुरेशी काळजी घेतल्याने महिन्याभरात एकही विद्यार्थी संक्रमित झाला नाही.
पहिल्या काही दिवसांनंतर जिल्हाभरात शाळांतील उपस्थिती नव्वद टक्क्यांवर गेली आहे. कोरोनाविषयक काळजी घेतल्याने शिक्षक किंवा विद्यार्थी नव्याने संक्रमित झालेले नाहीत. विद्यार्थी एक दिवसाआड वर्गात येतात. काही ठिकाणी पुरेशा खोल्या असल्याने दररोजची उपस्थिती शंभर टक्के आहे. प्रत्यक्ष शिक्षण सुरू झाल्याने विद्यार्थी व पालकांचाही उत्साह वाढल्याचे दिसून आले. - नामदेव माळी, प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी, सांगली
----