प्रकाश हॉस्पिटलमध्ये बुधवारपासून नॉन कोविड सेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:42 AM2020-12-15T04:42:57+5:302020-12-15T04:42:57+5:30
इस्लामपूर : येथील प्रकाश हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये २०१६ पासून ७०० बेडची अद्ययावत सेवा कार्यरत आहे. त्यातील १०० बेड ...
इस्लामपूर : येथील प्रकाश हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये २०१६ पासून ७०० बेडची अद्ययावत सेवा कार्यरत आहे. त्यातील १०० बेड कोविड रुग्णांसाठी ठेवून इतर ६०० बेड बुधवारपासून नॉन कोविड रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध असतील. एकूण १३ विभाग या सेवेसाठी सक्रिय होतील, अशी माहिती हॉस्पिटलचे संस्थापक, नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, हॉस्पिटलमध्ये पुण्या-मुंबईच्या धर्तीवर आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. याचा लाभ जिल्ह्यातील रुग्णांना घेता येईल. प्लाझ्मा थेरपीपासून सर्व सुविधा असणारी अत्याधुनिक रक्तपेढी कार्यरत आहे. कर्करोगाचे निदान करणारी बायोप्सी इथे होणार आहे. ९० बेडचे ७ प्रकारचे अतिदक्षता विभाग करण्यात आले आहेत. चिंताजनक रुग्ण, कमी चिंताजनक, शस्त्रक्रियेनंतरची दक्षता, दमा रुग्ण, नवजात शिशु, ० ते १६ वयोगटातील मुले आणि भाजून जखमी झालेल्या रुग्णांसाठी प्रत्येकी १० बेड आहेत. ३३ बेडची २४ तास उपलब्ध असणारी आपत्कालीन आरोग्यसेवा कार्यरत आहे. पाटील म्हणाले, वाळवा, शिराळा आणि मिरज तालुक्यातील ११३ गावे दत्तक घेण्यात आली आहेत. या गावात दरमहा सर्वरोग निदान आणि उपचार शिबिर होतील. प्रांजली ट्रस्टमार्फत मोफत औषधे आणि प्रयोगशाळा तपासण्या मोफत होणार आहेत. ११३ गावांतील शेतकरी कुटुंबांसाठी शेतकरी आरोग्य कार्डद्वारे प्रत्येक कुटुंबातील पाच व्यक्तींना मोफत आरोग्य सेवा दिली जाणार आहे. ही सेवा १ मे पासून सुरू करणार आहोत.
चौकट
व्यसनमुक्ती केंद्र सुरू
अलीकडच्या काळात आणि विशेषतः कोरोनाच्या बिकट परिस्थितीमुळे व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक वाढले आहे. युवा पिढी त्याला बळी पडत असल्याचे चित्र आहे. पुणे आणि मिरज येथे व्यसनमुक्ती केंद्र आहेत. त्यामुळे ही गरज लक्षात घेऊन प्रकाश हॉस्पिटलमध्ये १५ बेडचे व्यसनमुक्ती केंद्र बुधवारपासून सुरू होत आहे. यामध्ये रुग्णांवर उपचार, भोजन आणि निवास अशी सगळी व्यवस्था माफक दरात करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.