Gram Panchayat Election: असं ही एक गाव! फलकबाजीशिवाय रंगला प्रचार, गेल्या २२ वर्षांपूर्वीपासूनची परंपरा
By श्रीनिवास नागे | Published: December 15, 2022 05:47 PM2022-12-15T17:47:34+5:302022-12-15T19:07:52+5:30
ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात सोशल मीडियासह डिजिटल फलकबाजीने आघाडी घेतली आहे. पण..
विटा (जि. सांगली) : ग्रामपंचायत निवडणुकीचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आहे. प्रचारासाठी सोशल मीडियासह डिजिटल फलकबाजीने आघाडी घेतली आहे; परंतु खानापूर तालुक्यातील चिखलहोळ या गावात प्रचाराचा एकही फलक दिसत नाही. केवळ घराघरात पदयात्रेद्वारे प्रचाराचे तंत्र वापरणारे हे जिल्ह्यातील एकमेव गाव ठरले आहे.
खानापूर तालुक्यात निवडणुकीचा प्रचार धूमधडाक्यात सुरू असून सर्वच गावांत विद्यमान आमदार अनिल बाबर विरुद्ध माजी आमदार सदाशिवराव पाटील गटात संघर्ष सुरू आहे. चिखलहोळ या गावातही हे दोन गट समोरासमोर आहेत. सरपंचपद ओबीसी प्रवर्गासाठी असून येथे एका अपक्षासह तीन उमेदवार रिंगणात आहेत.
चिखलहोळ उच्च सुशिक्षित तरुण आणि अधिकाऱ्यांचे गाव म्हणून परिचित आहे. या गावातील अनेक जण प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर काम करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीपुरतेच स्थानिक राजकारण करणाऱ्या या गावाने संपूर्ण जिल्ह्याला आदर्श घालून दिला आहेत. या गावात दोन गटांत सत्तेसाठी सामना रंगला असताना प्रचारही जोमात सुरू आहे. सोशल मीडिया, डिजिटल बॅनर आदींमुळे प्रचाराचा धुरळा उडत असताना संपूर्ण गावात दोन्ही गटांचे प्रचाराचे एकही डिजिटल फलक दिसत नाहीत.
सलोख्याचे वातावरण
गेल्या २२ वर्षांपूर्वीपासून डिजिटल बॅनरबाजी टाळली असून ती परंपरा नव्या पिढीनेही सुरू ठेवली आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रचार आणि निकालापर्यंत व त्यानंतरही या गावात सलोख्याचे वातावरण कायम राहिले आहे. वैचारिक सलोखा जपणाऱ्या आणि सुमारे १८०० मतदार असणाऱ्या या गावात निवडणुकीच्या धामधुमीत प्रचारासाठी एकही फलक झळकला नाही, हे विशेष.