इव्हीएममध्ये नाही, त्यांच्या खोपडीत बिघाड : फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 02:44 PM2019-09-16T14:44:44+5:302019-09-16T14:47:25+5:30
इव्हीएममध्ये बिघाड झालेला नाही, तर त्यांच्या खोपडीत बिघाड झालेला आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी इस्लामपुरातील जाहीर सभेत केली. सांगली जिल्ह्यात सोमवारी दुपारी भाजपच्या महाजनादेश यात्रेचे आगमन झाले. कासेगाव आणि इस्लामपूर येथे यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.
इस्लामपूर/सांगली : इव्हीएममध्ये बिघाड झालेला नाही, तर त्यांच्या खोपडीत बिघाड झालेला आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी इस्लामपुरातील जाहीर सभेत केली.
सांगली जिल्ह्यात सोमवारी दुपारी भाजपच्या महाजनादेश यात्रेचे आगमन झाले. कासेगाव आणि इस्लामपूर येथे यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या यात्रेत महसूलमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते. या यात्रेचे स्वागत कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. यावेळी यात्रेत सामील झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी मार्गदर्शन केले.
महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी पेठ नाका येथे या महाजनादेश यात्रेचे स्वागत केले. यावेळी महाडिक गटाचे राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांना तलवार भेट देऊन यात्रेला शुभेच्छा दिल्या.
बोरगाव येथे नायकवडी कुटुंबाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यात्रेचे स्वागत केले. गौरव नायकवडी यांनी यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या जयघोषाच्या घोषणा दिल्या तसेच जल्लोषी स्वागत केले. यावेळी गौरव नायकवडी, वैभव नायकवडी, सुषमा नायकवडी यानी महाजनादेश यात्रेच्या रथावर जावून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला संबोधून पाच मिनिटे मनोगत व्यक्त केले.
कऱ्हाड मध्ये सत्यजित देशमुख भाजपमध्ये दाखल
दरम्यान, कऱ्हाड येथील कार्यक्रमात सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी छत्रपती उदयनराजे यांच्यासह शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सांगली भाजप जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. त्याला सोमवारी मूर्तस्वरूप आले. कऱ्हाडमध्ये महाजनादेश यात्रेनिमित्त मुक्कामी असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेदरम्यान हा प्रवेश देण्यात आला. त्यांच्यासोबत फत्तेसिंगराव देशमुख, संपतराव देशमुख, हणमंतराव पाटील, पी. वाय पाटील, बाजीराव शेडगे असे मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते.