द्राक्षे नव्हे... गुलकंद्राक्षे म्हणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:50 AM2021-02-28T04:50:05+5:302021-02-28T04:50:05+5:30

संतोष भिसे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दर्जेदार द्राक्ष उत्पादनाची नस सापडलेल्या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता त्यातही थक्क करणारे ...

Not grapes ... say chrysanthemums! | द्राक्षे नव्हे... गुलकंद्राक्षे म्हणा!

द्राक्षे नव्हे... गुलकंद्राक्षे म्हणा!

Next

संतोष भिसे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : दर्जेदार द्राक्ष उत्पादनाची नस सापडलेल्या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता त्यातही थक्क करणारे प्रयोग करायला सुरुवात केली आहे. वाढत्या स्पर्धेचा दरावर परिणाम होतो, त्यामुळे इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याची कल्पकता शेतकरी दाखवत आहेत. यातूनच चक्क सुगंधी द्राक्षांचे वाण विकसित झाले आहे. ही द्राक्षे खाल्ल्यानंतर जिभेवर गुलकंद आणि करवंदाचा स्वाद पसरतो. ही ‘गुलकंद्राक्षे’ चर्चेची आणि कुतूहलाची ठरली आहेत.

द्राक्ष उत्पादनात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेले सांगलीकर द्राक्षातून चांगले उत्पन्न घेत आहेत. हमखास उत्पादनाचे इंगित सापडल्यानंतर काही द्राक्षगुरूंनी वेलींवर कलमे करत वेगवेगळ्या जातींची पैदास सुरू केली. त्यातूनच खास सांगलीच्या अशा काही जाती देशभरात नावारूपाला आल्या. त्यातही शेतकऱ्यांमध्ये तीव्र स्पर्धा चालते. हटके काही तरी करण्याच्या महत्त्वाकांक्षेतूनच मणेराजुरी (ता. तासगाव) येथे सुगंधी द्राक्षांची बाग फुलवली.

सुरुवातीला यासाठीच्या द्राक्षकाड्या केरळमधून आणल्या. उर्वरित सर्व लागवड, खत-पाणी, औषधे मात्र स्थानिकच आहेत. ही द्राक्षे काळ्या रंगाची आहेत. शेतकऱ्याने स्वत:च्या नावाच्या इंग्रजी आद्याक्षरांवरून त्यांचे नामकरण केले आहे. ती खाताक्षणी जिभेवर संमिश्र स्वाद पसरतो. काही क्षणातच लक्षात येते, अरे हा तर गुलकंद! अर्थात, त्यामध्ये काहीसा डोंगरी करवंदांचा स्वादही मिसळला आहे.

चौकट

बिया औषधी गुणधर्माच्या

पुणे जिल्ह्यात यापूर्वी सुगंधी द्राक्षांचा प्रयोग झाला होता, पण ती चेरीच्या आकाराची होती. सांगलीतील द्राक्षे मात्र मोठ्या आकाराची व रसाळ आहेत. द्राक्षप्रेमींची पसंती बिनबियांच्या द्राक्षांना असली तरी, सुगंधी द्राक्षे मात्र बियांची आहेत. या बिया औषधी गुणधर्माच्या असल्याचा दावा केला जातो. द्राक्षांना चारपट जास्त दरही मिळाला. द्राक्षे पाहता-पाहता विकली गेली. जानेवारीमध्ये बाग संपलीदेखील!

चौकट

व्यावसायिक गुपित राखले

व्यावसायिक स्पर्धा टाळण्यासाठी या शेतकऱ्याने वाणाचा फारसा गाजावाजा केला नाही, पण स्वत:च्या नावाने बाजारात आणली. नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्याने या वाणाची माहिती दिली. सुरुवातीची काही वर्षे यातून मजबूत उत्पन्न मिळवायचे, यासाठी त्याची माहिती इतरांना न देण्याचे व्यावसायिक गुपित त्याने राखले आहे. इतर बागायतदार कलमे मागण्यासाठी गर्दी करतील, यासाठी स्वत:चे नाव प्रसिद्ध न करण्याची काळजी घेतली आहे.

Web Title: Not grapes ... say chrysanthemums!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.