बोगस माहितीबद्दल २२१ शिक्षकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:11 PM2018-08-28T23:11:35+5:302018-08-28T23:11:38+5:30
सांगली : शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या जिल्ह्यांतर्गत बदली व आंतरजिल्हा बदलीसाठी बोगस माहिती दिल्याने आणि कागदपत्रांतील त्रुटीप्रकरणी २२१ शिक्षकांना नोटिसा बजावण्याची कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाने मंगळवारी केली. शिक्षकांच्या बदल्यांतील हरकतींवर गुरुवारी सुनावणी होईल. सुनावणीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत कारवाईबाबत कोणता निर्णय देणार, याबाबत शिक्षकांना उत्सुकता आहे.
जिल्ह्यांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या आॅनलाईन बदलीमुळे अनेकांची अडचण झाली आहे. या बदल्या करताना पती-पत्नी यांच्या बदल्या, समानीकरणाच्या जागा रिक्त न ठेवणे यासह अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे काही शिक्षकांची गैरसोय झाली आहे, शासन आदेशाप्रमाणे या बदल्या झालेल्या नाहीत, अशाही तक्रारी करण्यात आल्या होत्या. या बदल्यांबाबत अनेकांनी हरकती घेतल्या आहेत. शिक्षकांना सोयीची बदली होण्यासाठी बोगस माहिती देण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय बहुतांशी शिक्षकांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. चुकीची माहिती देण्यासह कागदपत्रांतील त्रुटींसाठी संबंधित शिक्षकांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहे.
काही शिक्षकांनी स्वत:च्या आजाराचे खोटे प्रमाणपत्र, आई-वडील यांचा आजार, अपंग मूल, भावाचा सांभाळ करत आहोत, त्यामुळे आम्हाला दूरच्या शाळेवर नियुक्ती न देण्याची विनंती करणारी माहिती अर्जात भरलेली आहे. बदली प्रक्रियेत संवर्ग १ मध्ये गतिमंद, मंतिमंद, विकलांग मुलांचे पालकत्व स्वीकारणाऱ्यांना सवलत मिळते. या सवलतीचा जिल्ह्यातील काही शिक्षकांनी लाभ घेतला असून, यामध्येही काही त्रुटी आहेत. काहींनी पती-पत्नी एकत्रिकरणाखाली अर्ज केला असून तेही प्रमाणपत्र बोगस आढळून आले आहे. या शिक्षकांना कारवाईच्या नोटिसा जिल्हा परिषदेने दिल्या आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांत खळबळ उडाली आहे.
विस्थापित आक्रमक : कारवाईचा आग्रह
शिक्षकांनी बोगस माहिती भरल्यामुळे अनेक शिक्षकांना ‘खो’ बसल्याने त्यांना विस्थापित व्हावे लागले होते. यामध्ये काही शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांनाही विस्थापित व्हावे लागल्यामुळे, त्यांनी बोगस माहिती देणाºया शिक्षकांवर कारवाईसाठी आक्रमक भूमिका घेतली होती. विस्थापित शिक्षकांनी आंदोलनाचाही इशारा दिला होता. म्हणूनच जिल्हा परिषद प्रशासनाने बोगस माहिती देणाºया शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान, विस्थापित शिक्षकांनी बोगस माहिती दिलेल्या शिक्षकांना मूळ ठिकाणी पाठवून त्या ठिकाणी पूर्ववत आमची नियुक्ती झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
हरकती दाखल केलेल्या शिक्षकांचीही सुनावणी
जिल्ह्यातील शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे हरकती दाखल केल्या होत्या. या सर्व हरकती शिक्षणाधिकाºयांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे दाखल केल्या. त्यावर २५ ते २७ जुलै या तीन दिवसांच्या कालावधित पुण्यात सुनावणी झाली. त्यावेळी विभागीय आयुक्तांनी शिक्षकांना फटकारले होते. शिक्षकांनी विभागीय आयुक्तांसमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. बदल्यांसंदर्भातील शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी गुरुवार, दि. ३० रोजी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांच्याकडे सुनावणी होणार आहे.