सांगली बाजार समितीच्या ११५ व्यापाऱ्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 03:22 PM2020-01-16T15:22:21+5:302020-01-16T15:23:09+5:30
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य व्यापाऱ्यांनी आॅक्टोबर २०१९ पासून तोलाई मजुरी माथाडी मंडळाकडे जमा केलेली नाही. परंतु बाजार समितीनेही याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल हमाल संचालक बाळासाहेब बंडगर बुधवारी संतप्त झाले.
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य व्यापाऱ्यांनी आॅक्टोबर २०१९ पासून तोलाई मजुरी माथाडी मंडळाकडे जमा केलेली नाही. परंतु बाजार समितीनेही याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल हमाल संचालक बाळासाहेब बंडगर बुधवारी संतप्त झाले. त्यांनी बाजार समितीला टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर, सायंकाळी उशिराने ११५ व्यापाऱ्यांना कारवाईबाबतच्या नोटिसा पाठविण्यात आल्या.
सांगली कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा मार्केट यार्डात ८२ परवानाधारक तोलाईदार अनेक वर्षांपासून वजन-मापे भाणि त्यासंबंधित कामे करत आहेत. तत्कालीन पणन संचालकांनी लोवीनिक्स काट्यावर वजन-मापे करताना तोलाई कपात करू नये, असा आदेश १६ डिसेंबर २०१४ मध्ये दिला.
त्याला तत्कालीन पणन संचालक चंद्रकांत पाटील यांनी २२ डिसेंबर २०१४ रोजी स्थगिती दिली. त्याविरोधात चेंबर आॅफ कॉमर्स सांगली आणि काही व्यापारी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली, तेव्हा १६ डिसेंबरचा आदेश लागू केला.
तोलाईदार सभेने त्यावर दाद मागितली असता, शासनाला निर्णय घेण्याचे आदेश दिले. एक डिसेंबर २०१८ रोजी १६ डिसेंबरचा आदेश राज्यासाठी लागू केला. त्यानंतर तीन आॅक्टोबरपासून तोलाईदार काम करू लागले आहेत. परंतु आॅक्टोबरपासून त्यांची तोलाई जमा केलेली नाही. त्याबाबत २६ डिसेंबरपासून तोलाईदार सभेने बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. या प्रश्नांवर बाजार समिती सभापती दिनकर पाटील यांनी बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र पाच वाजेपर्यंत सभापती बाजार समितीत आले नाहीत. यामुळे संचालक बाळासाहेब बंडगर संतप्त झाले. सभापतींना तोलाईदारांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. तातडीने व्यापाऱ्यांना नोटिसा न दिल्यास शुक्रवारी बाजार समितीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला.
त्यानंतर अर्ध्या तासांनी सभापती पाटील बाजार समितीत आले. त्यांनी संबंधित व्यापाऱ्यांना नोटिसा देण्याच्या सूचना दिल्याने, अधिकाऱ्यांनी धावाधाव करीत व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन नोटिसा पोहोच केल्या. यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.