कुपवाडमध्ये माजी मंत्र्याच्या फार्म हाऊसला नोटीस, औद्योगिक विकास महामंडळाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 06:20 PM2017-11-07T18:20:06+5:302017-11-07T18:44:04+5:30
वनीकरणासाठी घेतलेल्या पण त्या जागेवर फार्म हाऊस असलेल्या कुपवाड एमआयडीसीतील एका माजी मंत्र्याशी संबंधित ज्ञानसंकल्प संस्थेच्या अडीच एकर भूखंडाचा ताबा परत घेण्याबाबतची नोटीस औद्योगिक विकास महामंडळाकडून देण्यात आली, अशी माहिती प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी पत्रकारांना दिली.
कुपवाड ,दि. ०७ : वनीकरणासाठी घेतलेल्या पण त्या जागेवर फार्म हाऊस असलेल्या कुपवाड एमआयडीसीतील एका माजी मंत्र्याशी संबंधित ज्ञानसंकल्प संस्थेच्या अडीच एकर भूखंडाचा ताबा परत घेण्याबाबतची नोटीस औद्योगिक विकास महामंडळाकडून देण्यात आली, अशी माहिती प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी पत्रकारांना दिली.
कुपवाड एमआयडीसीतील ६२ एकर खुली जागा शासनाने वृक्षारोपणासाठी काही संस्थांना दिली होती. त्या जागेवर शासनाच्या उद्देशाचे पालन न झाल्याने हे भूखंड शासनाने तातडीने ताब्यात घ्यावेत, अशी मागणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्सकडून करण्यात आली होती.
त्यानुसार हे प्लॉट तातडीने काढून घ्यावेत, असे आदेश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले गेले होते, तसेच उद्योग आघाडीनेही यासंबंधी पाठपुरावा केला होता. त्यानुसार प्रादेशिक अधिकारी देशमुख यांनी कुपवाड एमआयडीसीतील ज्या संस्थांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे, अशा संस्थांना नोटिसा देऊन त्यांच्याकडील भूखंड जप्त करून ते ताब्यात घेण्याची कारवाई जोरात सुरू केली आहे.
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी कुपवाड एमआयडीसीतील मिरज रस्त्यालगत असलेल्या एका माजी मंत्र्याशी संबंधित ज्ञानसंकल्प संस्थेच्या ताब्यात असलेल्या भूखंडावरील (क्र.ओ.एस बी -१ क्षेत्र ९१८९ चौ.मी.) फार्म हाऊसच्या दारावर नोटीस लावली. त्याची कॉपी त्यांच्या कामगारांकडे दिली आहे.
या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, आपण करारनामा केल्यानुसार कुपवाड औद्योगिक क्षेत्रातील भूखंड ९१८९ चौ.मी. वृक्षारोपणाकरिता २१ मार्च २०१२ ते ३० मार्च २०१७ या कालावधीसाठी आपणास वाटप करण्यात आला होता. या भूखंडाचा कालावधी संपुष्टात आला आहे व भूखंडावर विनापरवाना बांधकाम दिसून येत आहे.
हे बांधकाम पंचनामा करण्यापूर्वी आपण स्वखर्चाने काढून घ्यावे, अन्यथा महामंडळाने बांधकाम काढल्यास त्याचा खर्च आपणाकडून वसूल करण्यात येईल. त्यामध्ये आपले कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ जबाबदार असणार नाही.
मंगळवार, दि. २१ रोजी सकाळी अकरा वाजता हा भूखंड पंचनामा करून त्याचा ताबा महामंडळ घेणार असल्याने त्यापूर्वी आपण भूखंडाचा मूळ करारनामा व ताबा पावती या कार्यालयात त्वरित देण्यात यावी, अन्यथा या भूखंडाचा पंचनामा करून भूखंड महामंडळाच्या ताब्यात घेण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
गैरवापराखालील जागांबाबत पाठपुरावा
कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्सच्यावतीने वनीकरणासाठी वाटप केलेल्या जागांच्या गैरवापराबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार एमआयडीसीतील सुमारे २५ एकर जागा महामंडळाच्या ताब्यात आली आहे.
या गैरवापराखालील जागा काढून घेण्याबाबत कृष्णा व्हॅली चेंबरनेच पाठपुरावा केला होता. या जागा ताब्यात घेऊन यातील काही जागा प्लॉट पाडून लघु उद्योजकांना वाटप कराव्यात, अशी मागणी चेंबरतर्फे करण्यात आली.