सांगलीतील धोकादायक ३७ इमारती उतरविण्याची सूचना, पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून २६८ इमारत मालकांना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 12:46 PM2024-06-01T12:46:34+5:302024-06-01T12:46:49+5:30
सांगली : पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण महापालिकेने पूर्ण केले असून, तिन्ही शहरांत अतिधोकादायक ३७ इमारती सापडल्या आहेत. त्या इमारती ...
सांगली : पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण महापालिकेने पूर्ण केले असून, तिन्ही शहरांत अतिधोकादायक ३७ इमारती सापडल्या आहेत. त्या इमारती उतरविण्याच्या नोटिसा इमारत मालकांना बजावण्यात आल्या आहेत.
महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी अतिधोकादायक इमारती सापडल्या असून, त्या उतरविण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. इमारत मालकांनी त्या उतरविल्या नाहीत, तर महापालिकेमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील २६८ धोकादायक इमारतींना आजपर्यंत नोटिसा बजावल्या आहेत. प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ यांनी धोकादायक इमारतींच्या फेरसर्वेक्षणाचेही आदेश दिले आहेत.
महापालिकेमार्फत गेल्या तीन दिवसांपासून धोकादायक इमारतींचा भाग उतरविण्याचे काम सुरू केले आहे. धोकादायक इमारतींबाहेर फलकही लावण्यात येत आहे. अशा स्थितीत नोटिसा बजावून इमारत मालकांना तातडीने इमारत उतरविणे, दुरुस्ती करणे याबाबत ताकीद दिली आहे. इमारत मालकांनी महापालिकेचा आदेश पाळला नाही, तर महापालिकेमार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, सहायक आयुक्त, नगररचना विभागाचे अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांच्या संयुक्त पथकामार्फत धोकादायक घरांचे संयुक्त सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा अहवाल सादर करण्याची सूचनाही आडसूळ यांनी दिली आहे.