६५ लाख थकीत जीएसटी वसुलीसाठी माणगंगा कारखान्यास नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 09:29 PM2018-09-05T21:29:47+5:302018-09-05T21:32:28+5:30
आटपाडी येथील माणगंगा साखर कारखान्याने सुमारे ६५ लाख वस्तू व सेवा कर भरला नसल्याने केंद्रीय जीएसटी विभागाने दंडासह ६५ लाख रूपये जीएसटी वसुलीची नोटीस कारखान्यास दिली
मिरज : आटपाडी येथील माणगंगा साखर कारखान्याने सुमारे ६५ लाख वस्तू व सेवा कर भरला नसल्याने केंद्रीय जीएसटी विभागाने दंडासह ६५ लाख रूपये जीएसटी वसुलीची नोटीस कारखान्यास दिली आहे.
गतवर्षी जीएसटी आकारणी सुरू झाल्यानंतर माणगंगा कारखान्याने उत्पादित साखरेवर आॅक्टोबर १७ पासून जीएसटी कर भरला नसल्याचे तपासणीत आढळले. साखरेवर पाच टक्के जीएसटी आकारणी करण्यात येत असून, कारखान्याने सुमारे १३ कोटी रूपये किमतीच्या साखर उत्पादनावर जीएसटी भरला नसल्याने १० टक्के दंड आकारणी व व्याजासह कारखान्यास जीएसटी वसुलीची नोटीस देण्यात आली आहे.
कारखान्याने एका महिन्यात थकीत जीएसटी न भरल्यास जीएसटी नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. नोंदणी रद्द झाल्यास कारखान्यास साखर विक्री करता येणार नाही. जीएसटी आकारणी सुरू झाल्यानंतर कोल्हापूर विभागात थकबाकी वसुलीची पहिलीच कारवाई असून जीएसटी न भरणाऱ्या आणखी काही उद्योगांवर थकीत कर वसुलीची कारवाई करण्यात येणार असल्याचे केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. जिल्'ात सुमारे १७ साखर कारखाने असून या कारखान्यांतून उत्पादित होणाºया साखरेवर जीएसटी विभागाकडे दरमहा कोट्यवधी रूपये कर जमा होतो.
वसंतदादा साखर कारखान्याच्या सुमारे ३ कोटी रूपये थकीत अबकारी कर वसुलीसाठी जीएसटी विभागाने साखरसाठा ताब्यात घेतला आहे. कडेपूर येथील केन अॅग्रो कारखान्याच्या सुमारे ५५ लाख अबकारी कर वसुलीसाठी साखरसाठा ताब्यात घेण्यात आला आहे. थकीत कर न भरल्यास दोन्ही कारखान्यांच्या ताब्यात घेतलेल्या साखर साठ्याचा लिलाव करण्यात येणार असल्याचे केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे सहायक आयुक्त दिनेश नानल यांनी सांगितले.