शौचालय सुशोभिकरण घोटाळाप्रकरणी अधिकारी, कर्मचाऱ्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:24 AM2021-01-22T04:24:48+5:302021-01-22T04:24:48+5:30
मिरज : मिरज तालुक्यातील मागासवर्गीय समाजातील शौचालय सुशोभिकरण कामाच्या घोटाळा प्रकरणी मिरज पंचायत समितीतील कक्ष अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह ...
मिरज : मिरज तालुक्यातील मागासवर्गीय समाजातील शौचालय सुशोभिकरण कामाच्या घोटाळा प्रकरणी मिरज पंचायत समितीतील कक्ष अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ व तीन ठेकेदार संस्थांना घोटाळ्यातील रकमांच्या वसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याबरोबर नोटिसा बजावलेल्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचीही कारवाई करण्यात आली आहे. नोटिसांमुळे कारवाईची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
मिरज तालुक्यात स्वच्छ भारत अभियानांतर्गत. मागासवर्गीयांच्या शौचालय सुशोभिकरणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने सुमारे ७ लाख ८० हजार ९९३ इतका निधी मंजूर होता. या निधीत घोटाळा झाल्याची तक्रार बोलवाडचे माजी उपसरपंच सचिन कांबळे यांनी केली होती. याची गांभीर्याने दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी चौकशीचे आदेश दिले होते. गटविकास अधिकारी सरगर यांनी चौकशीचा अहवाल डुडी यांच्याकडे सादर केला आहे. यामध्ये सुट्टीच्या दिवशी टिपण्या लिहीणे, आदेश डावलून ग्रामपंचायतीेऐवजी निधी वितरणाचे तालुकास्तरावरून नियोजन करणे, रंगरंगोटीसाठी निविदा प्रक्रिया, प्रसिद्धी न करता मर्जीतील ठेकेदार संस्थांची निवड करून त्यांना काम सुरू करण्यापूर्वी शंभर टक्के अग्रीम बिले अदा करणे, कामाचा संपूर्ण निधी उचलूनही काम न करणे, कामे पूर्ण केल्याचा खोटा अहवाल सादर करणे यासह नियम व अटींचा भंग करीत संगनमताने शासनाचे आर्थिक व सामाजिक नुकसान केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आल्याने या घोटाळा प्रकरणी कक्ष अधिकारी संजय शिंदे, विस्तार अधिकारी सदाशिव मगदूम, स्वच्छ भारत अभियानचे कंत्राटी कर्मचारी सुमिता कांबळे, अरिफ शरिकमसलत यांना सीईओ डुडी यांच्या आदेशाने गटविकास अधिकारी आप्पासो सरगर यांनी नोटिसा बजावल्या आहेत.
घोटाळाप्रकरणी कंत्राटी कर्मचारी सुमिता कांबळे व अरिफ शरिकमसलत यांच्या तातडीने आटपाडी पंचायत समितीकडे बदल्या केल्या आहेत. नोटिसीचा खुलासा प्राप्त होताच घोटाळ्यात गुंतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे.
चौकट
तत्कालीन बीडिओंना वरिष्ठ देणार नोटीस
शौचालय सुशोभिकरण घोटाळ्याची शहानिशा न करता तत्कालीन सेवानिवृत्त गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ, कक्ष अधिकारी संजय शिंदे, विस्तार अधिकारी सदाशिव मगदूम यांनी सह्या केल्याने शिंदे व मगदूम यांना गटविकास अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. तत्कालीन बीडिओ संजय चिल्हाळ यांना मात्र जिल्हा परिषद स्तरावरून नोटीस बजावण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
संस्थांकडून होणार वसुली !
शौचालय रंगरंगोटीच्या कामाचा ठेकाच बेकायदेशीर दिल्याचे उघड झाले आहे. निधीचे तुकडे करून सुप्रेरणा बहुउद्देशीय संस्था मिरज, श्री सदगुरू कृषी विज्ञान मंडळ कोंगनोळी ता. कवठेमहांकाळ, क्रिएटीव्ह अर्बन आणि विकास सोसायटी मिरज या संस्थांना कामापूर्वी शंभर टक्के बिले अदा करूनही ३१ डिसेंबर २०२० पर्यंत कामे केली नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने त्यांच्याकडून दिलेल्या रकमांची व्याजासह वसुलीचे आदेश दिले आहेत. क्रिएटीव्ह संस्थेने उचललेली रक्कम काम न केल्याने भरणा केली असली तरी व्याजाच्या वसुलीचे आदेश आहेत.