कोरोना रूग्णांना उपचाराकरिता टाळाटाळ, सांगलीच्या श्वास हॉस्पीटलला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 01:38 PM2020-08-14T13:38:57+5:302020-08-14T13:42:54+5:30
सांगलीच्या श्वास हॉस्पीटल येथे कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांना उपचाराकरिता अद्यापही दाखल करून घेत नसल्याचे निदर्शनास आल्याने तसेच आदेशाचा अवमान केल्याने व रूग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्याने नोटीस देण्यात आली आहे.
सांगली : सांगलीच्या श्वास हॉस्पीटल येथे कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांना उपचाराकरिता अद्यापही दाखल करून घेत नसल्याचे निदर्शनास आल्याने तसेच आदेशाचा अवमान केल्याने व रूग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्याने नोटीस देण्यात आली आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार खाजगी रूग्णांलये आरक्षित करून त्यामधील खाटा कार्यान्वीत करण्यात येत आहेत. त्यानुसार महानगरपालिकेकडील दि. 19 जुलै 2020 रोजीच्या आदेशान्वये श्वास हॉस्पीटल सांगली आरक्षीत करून त्यामधील खाटा कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांच्यावर उपचार करण्यासाठी कार्यान्वीत करून तात्काळ आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत कळविण्यात आले होते.
हॉस्पीटलकरीता देण्यात आलेली बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट 1949 अंतर्गत नोंदणी रद्द का करू नये, अशी नोटीस महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी श्वास हॉस्पीटलला जारी करून खुलासा मागविला आहे.
श्वास हॉस्पीटलमध्ये कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांना उपचाराकरिता दाखल करून घेत नसल्याचे निदर्शनास आल्याने दि. 5 ऑगस्ट रोजी लेखी आदेशान्वये कळविले असता त्यांनी तीन दिवसाची मुदत मागीतली होती.
परंतु अद्यापही कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांच्यावर उपचारासाठी दाखल करून घेत नसल्याचे निदर्शनास आल्याने सदर हॉस्पीटलला नोटीस बजावून खुलासा मागविला आहे.