सांगलीत नदीप्रदूषणप्रश्नी महापालिकेला नोटीस, प्र्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 03:50 PM2018-02-05T15:50:38+5:302018-02-05T15:55:39+5:30
नदीप्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या शेरीनाल्याचे सांडपाणी रोखण्याबाबत सोमवारी उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी लिंबाजी भड यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला नोटीस बजावली. दरम्यान मृत माशांचा खच बाजुला करून महापालिका व परिसरातील सामाजिक संघटनांच्यावतीने नदीस्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.
सांगली : नदीप्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या शेरीनाल्याचे सांडपाणी रोखण्याबाबत सोमवारी उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी लिंबाजी भड यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला नोटीस बजावली. दरम्यान मृत माशांचा खच बाजुला करून महापालिका व परिसरातील सामाजिक संघटनांच्यावतीने नदीस्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.
कृष्णा नदीतील प्रदूषणाने कमाल मर्यादा ओलांडल्यामुळे सांगलीत रविवारी नदीतील मासे मृत्युमुखी पडले. मृत माशांचा खच पाण्यावर तरंगताना दुर्गंधीही पसरली होती. सांगलीत यापूर्वीही अनेकदा नदीतील मासे मृत होण्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.
पाण्यातील आॅक्सिजन नाहीसा होऊन जलचर प्राण्यांवर परिणाम होत असताना, शासकीय यंत्रणा नेहमीच झोपेचे सोंग घेत असतात. रविवारी पुन्हा त्याच गोष्टीची पुनुरावृत्ती घडली. मासे मृत्यूमुखी पडल्यानंतर महापालिकेला जाग आली. महापालिकेने सोमवारी स्वच्छता मोहिम हाती घेऊन थोडे फार गांभिर्य दाखविण्याचा प्रयत्न केला.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने रविवारी दुपारी नदीची पाहणी करून पंचनामा केला. पाण्याचे नमुनेही तपासणीला घेतले होते. त्यानंतर त्यांनी शेरीनाल्याच्या सांडपाण्याचीही पाहणी केली. पाण्याचा प्रवाह वाढल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे लिंबाजी भड यांनी महापालिकेला सोमवारी नोटीस बजावली.
महापालिकेने तातडीने शेरीनाल्याचे नदीत मिसळणारे सांडपाणी रोखावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा या नोटीशीद्वारे देण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिकेला आजवर अशा अनेक नोटीसा प्राप्त झाल्या आहेत. प्रत्येकवेळी ते प्रदूषण केल्याप्रकरणी दंड भरून मोकळे होतात. त्यामुळे नागरिकांच्या जिवाशी यानिमित्ताने खेळ सुरू आहे.
दररोज साडे पाच कोटी लिटर सांडपाणी
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातून दररोज ५ कोटी ६० लाख लिटर सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत असते. यात एमआयडीसीमधून मिसळणारे सांडपाणी १ कोटी लिटर इतके आहे. त्यामुळे प्रदूषणाचे हे प्रमाण किती भयंकर आहे, याची कल्पना येते. तरीही मंडळ, महापालिका किंवा नदीत सांडपाणी सोडणाऱ्या ग्रामपंचायतींना याचे कोणतेही गांभीर्य नाही.