सांगली जिल्हा बँकेच्या आजी-माजी संचालकांसह ४१ जणांना नोटीस, नेमकं प्रकरण काय..जाणून घ्या

By अशोक डोंबाळे | Published: June 14, 2024 05:08 PM2024-06-14T17:08:55+5:302024-06-14T17:09:37+5:30

सहकार विभागाकडून नोटिसा

Notice to 41 people including former director of Sangli district bank | सांगली जिल्हा बँकेच्या आजी-माजी संचालकांसह ४१ जणांना नोटीस, नेमकं प्रकरण काय..जाणून घ्या

सांगली जिल्हा बँकेच्या आजी-माजी संचालकांसह ४१ जणांना नोटीस, नेमकं प्रकरण काय..जाणून घ्या

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५०.५८ कोटींचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी बँकेच्या आजी-माजी संचालक व अधिकाऱ्यांसह ४१ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. २७ जून रोजी म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. चौकशी अधिकारी तथा कोल्हापूर शहर उपनिबंधक डॉ. प्रिया दळणर यांनी नोटिसा दिल्या आहेत.

बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या काही निर्णयांबाबत सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यावर सहकार आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित तक्रारीत तथ्य आढळल्याने तत्कालीन संचालकांनी घेतलेल्या निर्णयामुळे चार प्रकरणांत बँकेचे ५० कोटी ५८ लाख ८७ हजारांचे नुकसान झाले आहे. नुकसानीची जबाबदारी निश्चित करून वसुलीसाठी कलम ८८ अंतर्गत चौकशीची शिफारस करण्यात आली. त्यानुसार कलम ८८ अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. 

महांकाली, माणगंगा साखर कारखान्यांच्या खरेदीत १ कोटी १७ लाख, जिल्ह्यातील ७६३ विकास संस्थांच्या संगणकीकरणावर अनावश्यक खर्च १४ कोटी ६७ लाख, नॉन बँकिंग अस्सेट खरेदीत चुकीचा जमा खर्च २२ कोटी ४२ लाख, महांकाली कारखान्याची शिल्लक व खराब साखर विक्रीत ११ कोटी ५१ लाख रुपयांचे नुकसानीचा ठपका ठेवला आहे. याप्रकरणी बँकेकडून आजी-माजी संचालक, अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून खुलासा करण्याची सूचना डॉ. प्रिया दळणर यांनी नोटिसामध्ये केल्या आहेत.

सहकार विभागाकडून यांना नोटिसा

नोटीस बजावण्यात आलेल्यांमध्ये विद्यमान अध्यक्ष व शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, नूतन खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार मोहनराव कदम, अनिल बाबर (मयत), विलासराव शिंदे (मयत), अजितराव घोरपडे, संचालक तानाजी पाटील, प्रकाश जमदाडे, बी.एस. पाटील, दिलीपतात्या पाटील, संग्रामसिंह देशमुख, महेंद्र लाड, वैभव शिंदे, सुरेश पाटील, पृथ्वीराज पाटील, राहुल महाडिक, सत्यजित देशमुख, अनिता सगरे, बाळासाहेब होनमोरे, मन्सूर खतीब, चिमण डांगे, माजी संचालक उदयसिंह देशमुख, गणपती सगरे (मयत), प्रतापराव पाटील, झुंझारराव शिंदे, बी.के. पाटील, सी.बी. पाटील, श्रद्धा चरापले, कमल पाटील, सिकंदर जमादार, चंद्रकांत हाक्के (मयत), तज्ज्ञ संचालक मनोज शिंदे, सरदार पाटील, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल चौथे, जयवंतराव कडू, बाळासाहेब रामदुर्ग, प्रतापसिंह चव्हाण यांचा समावेश आहे.

नोटिसा मिळताच अपील करणार

जिल्हा बँकेचे ५०.५८ कोटींचे नुकसानीस संचालक जबाबदार नाहीत. चौकशी बेकायदेशीर, चुकीची आहे. नोटीस मिळताच सहकार मंत्र्यांकडे अपील करणार आहे. प्रसंगी न्यायालयातही जाणार आहे. ज्या प्रकरणात बँकेचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे, त्यात संचालकांनी एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. चौकशी अहवालातही तसे म्हटले आहे. या केवळ तांत्रिक व प्रशासकीय कामकाजातील त्रुटी आहेत. त्याला संचालक जबाबदार ठरत नाहीत, अशी भूमिका सर्व संचालकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Notice to 41 people including former director of Sangli district bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.