बाराजणांना लवकरच नोटिसा
By admin | Published: January 13, 2015 11:37 PM2015-01-13T23:37:40+5:302015-01-14T00:30:10+5:30
सहकार विभागाची तयारी : पतसंस्था अपहार प्रकरण
सांगली : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या आण्णासाहेब पाटील पतसंस्थेतील सव्वादोन कोटी रुपये आर्थिक गैरव्यवहाराबाबत कलम ८८ प्रमाणे चौकशीत अध्यक्ष, सचिवांसह १२ संचालकांना सोमवारी दोषी ठरविण्यात आले आहे. त्यानुसार आज, मंगळवारपासून वसुलीपूर्व कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात झाली. लवकरच संबंधितांना नोटिसा पाठविल्या जाणार असल्याची माहिती तालुका उपनिबंधक व चौकशी अधिकारी मनोहर माळी यांनी दिली. आण्णासाहेब पाटील पतसंस्थेने २ कोटी २५ लाख २६ हजार रक्कम बल्लाळेश्वर या बंद पडलेल्या संस्थेत ठेवली होती. २०१०-११ मध्ये ठेव ठेवण्यास वार्षिक सभेने व संचालक मंडळाने मान्यता दिली होती. ठेवीची रक्कम अडकल्याने व जाहिरातींसाठी २६ हजार रुपये खर्चाचा गैरव्यवहार लेखापरीक्षणात उघड झाल्याने घोटाळ्याच्या निश्चितीसाठी कलम ८८ प्रमाणे चौकशी करण्यात आली. चौकशी अधिकारी मनोहर माळी यांनी चौकशी पूर्ण करून चौकशी अहवालात अध्यक्ष आण्णासाहेब पाटील यांच्यासह सर्व संचालकांना दोषी ठरविले आहे. प्रत्येक संचालकांची १८ लाख ७५ हजार रुपयांची जबाबदारी चौकशीत निश्चित करण्यात आली आहे. अध्यक्ष आण्णासाहेब पाटील, सचिव गणपती शिंदे, संचालक मालती कोळी, कल्पना देशमुख, सलीम शेख, रावसाहेब कवठेकर, विशाल पाटील, शंकर कोळी, जयंत माने, दयानंद लोंढे, कल्पना रेगडे आदींवर जबाबदारी निश्चित झाली आहे. (प्रतिनिधी)