दोन स्वच्छता मजूर सोसायट्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:27+5:302021-06-24T04:19:27+5:30
फोटो - वापरणे. सांगली : इमारतींच्या स्वच्छतेचा ठेका असणाऱ्या मजूर सोसायट्यांनी मजुरांना काम न देता अर्धा पगार दिल्याची बाब ...
फोटो - वापरणे.
सांगली : इमारतींच्या स्वच्छतेचा ठेका असणाऱ्या मजूर सोसायट्यांनी मजुरांना काम न देता अर्धा पगार दिल्याची बाब स्पष्ट झाल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी दोन सोसायट्यांना नोटीस बजावली.
मातोश्री मजूर सेवा संस्थेला महात्मा गांधी वस्तीगृह, कडेगाव, तासगाव, पलूस पंचायत समितीची स्वच्छतागृहे यांची स्वच्छता करण्याचे काम देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेची मोठी इमारत, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निवासस्थान व परिसराची देखभाल स्वच्छतेचे काम वसंत मजूर सेवा सोसायटीला दिले आहे.
वास्तविक नोंदणीकृत मजूर सोसायट्यांना काम दिल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील मजुरांना काम देणे क्रमप्राप्त आहे, मात्र या दोन्ही सोसायट्यांच्या दप्तरी नोंद असणाऱ्या मजुरांना काम देण्याऐवजी अन्य मजुरांना काम दिल्याचे स्पष्ट झाले. महिन्यातील चार सुट्या वगळता प्रतिदिन ४७५ याप्रमाणे महिन्याला सुमारे ११ हजार रुपये मजुरांना मिळायला हवे होते, मात्र या मजुरांना केवळ साडेचार हजार रुपये प्रतिमाह देण्यात आले.
बांधकाम समिती सभापतींनी याबाबत गुडेवार यांना चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार गुडेवार यांनी चौकशी केली. मजूर सोसायट्यांनी कामासाठी नेमलेले मजूर हे त्या संस्थेकडे नोंदणी नसलेले होते. त्यांना दरमहा पगार केवळ साडेचार हजार रुपये इतका होता. सोसायट्यांकडून मजुरांचे शोषण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वसंत व मातोश्री या दोन्ही मजूर सोसायटीच्या अध्यक्षांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती गुडेवार यांनी दिली.
संबंधित मजूर सोसायट्यांना संबंधित कागदपत्रे हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये कॅश बुक, बँक स्टेटमेंट, लेखापरीक्षण, मजुरांची नोंद असणारी नोंदवही, संबंधित ठेक्याच्या ठिकाणी काम करत असलेल्या मजुरांची यादी, त्यांना देण्यात येणाऱ्या वेतनाची माहिती २ जुलैपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माहिती न दिल्यास सोसायट्यांची नोंदणी रद्द करणे, काळ्या यादीत टाकणे, आयकर विभाग व जीएसटी विभागास माहिती देऊन कारवाईचा प्रस्ताव पाठविला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.