कोरोना रुग्ण जास्त असणाऱ्या गावावर लक्ष द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:24 AM2021-04-26T04:24:50+5:302021-04-26T04:24:50+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील ज्या गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्या गावावर लक्ष केंद्रित करून कोरोना रुग्णांची संख्या ...
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील ज्या गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्या गावावर लक्ष केंद्रित करून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणावी. पोलीस प्रशासनाने या गावात गस्त वाढवावी, अशी सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली.
येथील तहसीलदार कार्यालयात मंत्री पाटील यांनी तालुक्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन काही सूचना केल्या. यावेळी सभापती शुभांगी पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नरसिंह देशमुख, मुख्याधिकारी अरविंद माळी, आष्ट्याचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, ज्या घरात कोरोना रुग्ण आहेत, त्या घरास स्टिकर लावावे. ते स्टिकर काढून टाकल्यास ते घर सील करावे.
इस्लामपूर व आष्टा या शहरांतील ज्या भागात कोरोना संख्या वाढत आहे, त्या भागात कंटेन्मेंट झोन करावा. यावेळी त्यांनी तालुक्यातील लसीकरण कामाचा आढावा घेतला.
शशिकांत शिंदे यांनी तालुक्यातील कोरोना संसर्ग आणि लसीकरणाची माहिती दिली. यावेळी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, ॲड. चिमण डांगे, संजय कोरे, शहाजी पाटील, अरुण कांबळे, विराज शिंदे, संग्राम फडतरे यांनी सूचना मांडल्या. देवराज पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, खंडेराव जाधव, पिरअली पुणेकर, आयुब हवालदार, शकील जमादार, संदीप माने उपस्थित होते.
चाैकट
एजन्सी म्हणून काम करतात का?
बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभाराची माहिती दिल्यावर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उपकरणात काही वेळा दोष निर्माण होऊ शकतो. मात्र, रुग्णांना भीती घालण्याचा उद्देश काय, कुणाची तरी एजन्सी म्हणून तेथे काम चालते का, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. या घटनेची माहिती घेऊ, असेही ते म्हणाले. दरम्यान गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी या प्रकाराची चौकशी करणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.