सांगली महापालिकेच्या लेटलतिफ ८४ कर्मचाऱ्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:59 PM2018-09-25T12:59:36+5:302018-09-25T13:02:34+5:30
सांगली महापालिकेच्या लेटलतिफ ८४ कर्मचारी व अधिकाऱ्यांवर आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी कारवाईचा बडगा उगारला. सलग सुटीनंतर सोमवारी हे कर्मचारी व अधिकारी सकाळी कार्यालयात गैरहजर होते.
सांगली : महापालिकेच्या लेटलतिफ ८४ कर्मचारी व अधिकाऱ्यांवर आयुक्तरवींद्र खेबूडकर यांनी कारवाईचा बडगा उगारला. सलग सुटीनंतर सोमवारी हे कर्मचारी व अधिकारी सकाळी कार्यालयात गैरहजर होते. या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात आणि शिस्तभंगाच्या कारवाईबद्दल नोटिसा देण्याचे आदेशही आयुक्तांनी कामगार अधिकाऱ्यांना दिले.
महापालिकेचे कार्यालय शनिवार, रविवार सुटीनिमित्त बंद होते. सोमवारी सकाळी सर्व कर्मचारी व अधिकारी कार्यालयीन वेळेत आवश्यक होते; पण सांगलीतील मुख्यालयासह शाळा नंबर एकजवळील प्रमुख कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती नगण्य होती.
नागरिक हक्क संघटनेचे वि. द. बर्वे हे सकाळी दहा वाजता महापालिकेत कामानिमित्त आले होते. तेव्हा त्यांना कार्यालयात कर्मचारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी थेट आयुक्त खेबूडकर यांना दूरध्वनी करून कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीची कल्पना दिली. बर्वे यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत आयुक्तांनी तातडीने सर्वच विभागांकडून हजेरीपत्रक मागविले.
यात उपायुक्त, नगररचना, मुख्यालय, आस्थापना, प्रभाग समित्या, बांधकाम, आरोग्य, महिला बालकल्याण, स्थायी समिती आणि नगरसचिव कार्यालयांमध्ये शाखा अभियंता, आरेखक, शिपाई, कनिष्ठ लिपिक, आरोग्य निरीक्षकांसह तब्बल ८४ कर्मचारी व अधिकारी कार्यालयात वेळेवर हजर नसल्याचे आढळून आले.
या लेटलतिफ कर्मचाऱ्यांचा लेखाजोखा तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी कामगार अधिकारी चंद्रकांत आडके यांना दिले. त्यानुसार संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात आणि गैरहजेरीबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले. आडके यांनी त्यासंदर्भात संबंधितांना नोटिसा बजावल्या.