शिस्त न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईच्या नोटिसा : मिरज पंचायत समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:59 PM2018-06-04T23:59:51+5:302018-06-05T00:00:49+5:30
मिरज : मिरज पंचायत समितीत शिस्त न पाळणाºया २२ कर्मचाºयांना सक्त कारवाईच्या नोटिसा बाजविण्यात आल्या. वारंवार सूचना देऊनही त्या धुडकाविल्या जात असल्याने प्रशासनाकडून या नोटिसा दिल्या.
मिरज : मिरज पंचायत समितीत शिस्त न पाळणाºया २२ कर्मचाºयांना सक्त कारवाईच्या नोटिसा बाजविण्यात आल्या. वारंवार सूचना देऊनही त्या धुडकाविल्या जात असल्याने प्रशासनाकडून या नोटिसा दिल्या. यामध्ये कर्मचाऱ्यांबरोबरच काही अधिकाºयांचाही समावेश आहे. मिरज पंचायत समितीतील कामकाजात दिरंगाई होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. या तक्रारी जिल्हा परिषदेच्या प्रशासनापर्यंत पोहोचल्याने अलीकडे पंचायत समितीत जि. प. वरिष्ठ अधिकाºयांच्या भेटीत वाढ झाली आहे.
जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी पंचायत समितीस भेट देऊन अपुरे कामकाज व दिरंगाईबाबत विभागप्रमुखांची झाडाझडती घेतली होती. राऊत यांच्यानंतर नव्याने दाखल झालेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी घुले यांनी पंचायत समितीस भेट दिली होती. या भेटीत त्यांनाही अशाच पध्दतीच्या कारभाराचा अनुभव आला. त्यांनी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पंचायत समितीस भेट दिली होती. कर्मचारी ओळखपत्राशिवाय त्यांच्यासमोर वावरत होते.
घुले हे थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसल्यानंतर कर्मचाºयांना व अधिकाºयांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी आल्याचे समजताच वेळेपूर्वी घरी जाण्याच्या तयारीत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. घुले यांनीही विभागप्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी अधिकारी व कर्मचाºयांकडे ओळखपत्र नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ओळखपत्र बाळगण्याची सूचना दिली.
मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांनी वारंवार सूचना देऊनही ओळखपत्र सक्तीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पालन होत नसल्याने सहायक गटविकास अधिकारी संजय शिंदे यांनी पंचायत समितीतील प्रत्येक विभागाला अचानक भेटी दिल्या.या भेटीत त्यांना अधिकारी व कर्मचारी अशा २२ जणांकडे ओळखपत्र नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या सर्वांना सक्तीच्या कारवाईच्या नोटिसा बाजवल्या. या कारवाईनंतर दुसºया दिवसापासून ओळखपत्र दिसू लागले आहे.
टपरीवरील कर्मचाऱ्यांनाही नोटिसा
मिरज पंचायत समितीच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत चहा टपरीवर वेळ घालविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची सदस्यांची मागणी आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन पंचायत समिती प्रशासनाकडून चारजणांना सक्तीच्या कारवाईच्या नोटिसा बाजविण्यात येणार असल्याचे सहायक गटविकास अधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले. गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक गटविकास अधिकारी संजय शिंदे यांनी कठोर भूमिका घेतल्याने पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांना शिस्त लागू लागली आहे.