महापालिका क्षेत्रातील एटीएम सेंटर्सना घरपट्टीच्या नोटिसा
By admin | Published: January 6, 2015 12:02 AM2015-01-06T00:02:03+5:302015-01-06T00:46:21+5:30
माहिती संकलनानंतर भाडेकरारानुसार संबंधित एटीएमची घरपट्टी निश्चित केली जाणार आहे.
सांगली : महापालिकेच्या घरपट्टी विभागाने आजवर दुर्लक्षित असलेल्या विविध बँकांच्या एटीएम सेंटर्सना आता लक्ष्य केले आहे. महापालिका क्षेत्रात असलेल्या एटीएम सेंटर्संची माहिती गोळा करतानाच प्रत्येक प्रभागातील संबंधित कर्मचाऱ्यांमार्फत घरपट्टीच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. माहिती संकलनानंतर भाडेकरारानुसार संबंधित एटीएमची घरपट्टी निश्चित केली जाणार आहे. महापालिका क्षेत्रात सुमारे ९० एटीएम सेंटर्स असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात किती एटीएम आहेत, याची माहिती आता घरपट्टीच्या निमित्ताने घेतली जात आहे. आजवर बँकांच्या एटीएम सेंटर्सना घरपट्टी आकारलीच जात नव्हती. महापालिकेच्या सभागृहात याविषयी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आयुक्तांनी याप्रकरणी सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. घरपट्टी विभागाने आता माहिती संकलनावेळीच संबंधित एटीएम सेंटर्सच्या जागा मालकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. संबंधित एटीएमला दिलेल्या जागेच्या भाड्याचे करारपत्र, संबंधित जागेची कागदपत्रे त्यांच्याकडून मागविण्यात आली आहेत. कागदोपत्री माहिती संकलन केल्यानंतर प्रत्यक्ष त्यांची घरपट्टी निश्चित केली जाणार आहे. महापालिकेच्या घरपट्टी विभागाने प्रथमच अशाप्रकारे एटीएमना घरपट्टीच्या कक्षात घेतले आहे. यापूर्वी घरपट्टी विभागाच्या दफ्तरी एटीएम केंद्रांची स्वतंत्र नोंदच नव्हती. अनेक जागामालकांनी केवळ गाळा भाड्याने दिल्याचे सांगून किंवा संबंधित जागा स्वत: वापरत असल्याचे सांगून घरपट्टी टाळली होती. बऱ्याच बँकांनी स्वत:च्या जागेत स्वतंत्र एटीएम केंद्र उभारून त्याविषयीची नोंद महापालिकेकडे केली नव्हती. अशा सर्व एटीएमना आता स्वतंत्र व्यावसायिक घरपट्टी लागू केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
बीएसएनएलची वसुली उद्या
बीएसएनएलकडील ४२ लाखांच्या घरपट्टी थकबाकीसाठी महापालिकेने वारंवार पाठपुरावा केला. यासंदर्भात नोटिसाही बजावल्या होत्या. डिसेंबर महिन्यात कंपनीचे कार्यालय सील केले होते. त्यानंतर कंपनीने आठ दिवसांची मुदत मागवून घेतली होती. घरपट्टीपोटी पाठविलेल्या प्रस्तावाची प्रक्रिया दिल्लीहून पूर्ण होणार असल्याने कंपनीला आणखी मुदतवाढ दिली आहे. येत्या ७ जानेवारीस कंपनीकडून वसुली केली जाणार असल्याचे घरपट्टी अधिकाऱ्यांनी सांगितले
घरपट्टी वसुलीसाठी महापालिकेने ३५१ थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस बजावली आहे. येत्या आठवडाभरात आणखी साडेतीनशे नोटिसा बजावण्यात येणार आहेत. चालू आर्थिक वर्षातील मागणी आणि जुनी थकबाकी मिळून घरपट्टी विभागाला ५0 कोटी रुपयांची वसुली करायची आहे.