‘ज्वेलथीफ’ सुबोध सिंगचा जेलमधून ‘खेल’; पाच वर्षांपासून सोनेलुटीचा सिलसिला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 04:16 PM2023-12-11T16:16:33+5:302023-12-11T16:17:10+5:30
सांगलीतील सोने जप्तीचे आव्हान
घनश्याम नवाथे
सांगली : ‘डॉन का इंतजार तो ग्यारह मुलखोंकी पुलिस कर रही है’ हा डायलॉग एकेकाळी चांगलाच गाजला. परंतु सध्या असाच प्रसंग एक दोन नव्हे तर सात राज्यातील पोलिसांसमोर देशातील सर्वात कुख्यात ‘ज्वेल थीफ’ सुबोध सिंगने निर्माण केला आहे. पाच वर्षे तुरुंगाच्या भिंतीआडून त्याने शंभरहून अधिक जणांची टोळी बनवत एक-दोन नव्हेतर तब्बल ३०० किलो सोने लुटल्याचा अंंदाज आहे.
‘जेल से खेल’ करणाऱ्या सुबोध सिंगने सोने लुटण्याचा सिलसिला सुरूच ठेवत पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. सांगली पोलिसांनी त्याला ‘रिलायन्स ज्वेल्स’ दरोड्यात ताब्यात तर घेतले. परंतु त्याचा तपास करून सोने वसूल करण्याचे मोठे आव्हान आहे.
बिहार म्हणजे गुन्हेगारांचे आगर असेच काहीसे समीकरण गेल्या काही वर्षांत बनले आहे. परंतु एकेकाळी याच बिहारमधील नालंदा विद्यापीठाचा जगात गवगवा होता. याचा नालंदाजवळील चंडी येथील सुबोध सिंग या आठवी उत्तीर्ण गुन्हेगारांने सोनेलुटीचा सपाटा लावत देशातला सर्वांत कुख्यात ‘ज्वेल थीफ’ म्हणून ख्याती मिळवली. २०१८ मध्ये बिहार विशेष पथकाने त्याला उचलला. थेट कारागृहात रवानगी केली. परंतु सुबोधला अटकेची फिकीरच नाही. कारण त्याने जेलमधून त्याचे गुन्हेगारीचे वलय वाढवले. अर्थात त्याला राजकीय व शासकीय अधिकाऱ्यांनीही पाठीशी घातले आहे.
जेलमध्ये येणाऱ्या गुन्हेगारांची कुंडली काढून त्याने वेगवेगळ्या टोळ्याच बनवण्याचा उद्योग पाच वर्षांत केला. जेलमध्ये मिळणाऱ्या सुविधामधून तो या टोळ्यांवर अंकुश ठेवतो. जेलमधून गुन्हेगारी टोळ्या चालवण्याचा प्रसंग आपण चित्रपटातून पाहतो. परंतु त्यापुढे एक पाऊल सुबोध सिंगने टाकले आहे. केवळ बिहारच नव्हेतर राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यातील सोनेलुटीचा ‘मास्टरमाईंड’ तोच असल्याचे तपासात पुढे आले आहे.
‘कानून के लंबे हात’ पोहोचण्यात अडथळे
सोने लुटीचा मास्टरमाईंड सुबोध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही राज्यातील पोलिसांनी ‘कानून के लंबे हाेते है’ असे म्हणत बिहारकडे मोर्चा वळवला. परंतु पाटणाजवळील बेऊर जेलच्या मजबूत भिंतीसारखीच यंत्रणा सुबोधने स्वत:भोवती निर्माण केली आहे. राजकीय व प्रशासकीय यंत्रणा ताब्यात असल्यामुळे त्याचा ताबा घेणेही पोलिसांना मुश्किल बनले होते. तीन महिन्यांच्या प्रयत्नानंतर ‘रिलायन्स ज्वेल्स’ दरोड्यात त्याचा ताबा सांगली पोलिसांना मिळाला. ज्वेलथीफ हाती लागला. सोने व फरार साथीदार अद्याप मिळाले नाहीत.
ग्रॅममध्ये नव्हे तर किलोमध्येच लुटतो
सुबोध सिंग हा ग्रॅममध्ये नाहीतर किलोमध्येच सोने लुटतो, अशी माहिती आजवरच्या दरोड्यातून पुढे आली आहे. ३०० किलो सोने आजवर चोरल्याचे सांगितले जाते. परंतु ते जप्त करण्यात अद्याप यश आले नाही.
जेलमध्येच सुरक्षित समजतो
२०१८ पासून सुबोध कारागृहातून टोळ्या चालवतो. बाहेर आल्यास जीवितास धोका आहे. त्यामुळे जेलमधूनच सर्व खेळ करतो. अर्थात त्यासाठी त्याला आजवर बड्यांनी पाठिंबा दिला आहे. बेऊर जेलच त्याचा अड्डा बनला आहे.