पोषण आहारातून तूरडाळ गायब
By admin | Published: November 9, 2015 10:42 PM2015-11-09T22:42:00+5:302015-11-09T23:28:37+5:30
भाववाढीचा फटका : अंगणवाड्या, प्राथमिक शाळांमध्ये चवळीचा वापर
गजानन पाटील - संख वाढत्या महागाईचे चटके जत तालुक्यातील शाळकरी मुलांनाही जाणवू लागले आहेत. तूरडाळीचे दर गगनाला भिडले असल्याने शालेय पोषण आहारातून तूरडाळीचे वरण गायब झाले आहे. तूरडाळीऐवजी चवळीचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. तांदूळ व धान्य पुरवठादाराने चवळी पुरवण्यास सुरुवात केली आहे. सध्या बेचव चवळीचे वरण, आमटी खाण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.केंद्र शासन व राज्य शासनाकडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत १ ली ते ५ वी पर्यंतच्या प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्राथिनेयुक्त व ६ वी ते ८ वीपर्यंतच्या उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. या योजनेत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रतिविद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो.अन्न शिजविण्यासाठी दरदिवशी प्रतिलाभार्थी ३.५९ पैसे आणि ५.३८ रुपये खर्च दिला जात होता. आता त्यात केंद्र सरकारने ५ टक्के दरवाढही केली आहे. ग्रामीण भागातील शाळास्तरावर शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पाककृतीच्या अंमलबजावणीत २०११ च्या शासन निर्णयानुसार तुरडाळीचा समावेश करण्यात आला होता. पण पुरवठादाराने दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बाजारात तुरडाळीचा दर्जा चांगला नसल्याचे कारण समोर करुन तूरडाळीऐवजी मुगाच्या डाळीचा पाककृतीत समावेश करण्यास सांगितले.धान्याच्या पुरवठ्याची जबाबदारी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे आहे. त्यांनी जिल्हा परिषदेला पत्र पाठवून मंजुरी मागितली होती. जिल्हा परिषदेने त्यासाठी नुकतीच मान्यता प्रदान केली आहे. सध्या तूरडाळीचा दर गगनाला भिडला आहे. बाजारात २२० रुपयेपर्यंत दर वाढला आहे.
कमी पटसंख्या असलेल्या शाळा व विशेषत: दुर्गम भागातील शाळा मुलांना खाण्यासाठी लागणारा मसाले भात शाळेतच शिजवतात. गावातील महिला बचत गट किंवा संस्थांकडूनच भात शिजवून घेतला जातो. कंत्राटदारांकडून शाळेतील पटसंख्येच्या प्रमाणात तांदूळ, तेल, डाळ, मीठ, मिरचीसह आवश्यक तो माल महिन्या-महिन्याला पोहोच केला जातो.
बाजारात दर वाढला म्हणून शालेय पोषण आहारातून तूरडाळ हद्दपार झाली आहे. मुलांना तूरडाळ वरण मिळणार नाही. मुले भात खाणार नाहीत. शासनाने पूर्वीप्रमाणे तूरडाळच पुरवावी.
- विलास शिंदे, पालक
शिक्षकही वैतागले
मुलांना तूरडाळीऐवजी चवळीची भाजी मिळणार आहे.पोषण आहारात विविधता असावी, अशी अपेक्षा असताना एकीकडे खिचडी खाऊन कंटाळलेले विद्यार्थी आणि दुसरीकडे शिकविण्यासोबत आहाराकडे लक्ष देण्याच्या कामामुळे वैतागलेले आहेत.
महागाई : चवळीच्या वरणाला चवच नाही
तूरडाळ व चवळी डाळ या दोन्ही डाळींच्या प्रथिनमूल्यांमध्ये फरक नसला तरी, चवीत फरक आहे. तूरडाळीचे वरण चवीला चविष्ट आहे, तर चवळीच्या डाळीचे वरण, आमटी सपक आहे. अशा परिस्थितीत तूरडाळ चांगली, पण महागडी म्हणून चवळी वापरण्याचा ठेकेदाराचा हट्ट बालकांना पचणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तूरडाळ
१८०
रूपये किलो
गेल्या काही दिवसात दरामध्ये काहीशी घसरण झाली असली तरी, अजूनही १६० ते १८० रुपये किलो दराने तूरडाळीची विक्री होत आहे. संबंधित पुरवठादाराने बाजारात चांगल्या दर्जाची तुरडाळ उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले असले तरी, सणासुदीच्या काळात महागलेली तूरडाळ पुरविणे शक्य होणार नाही. हे ओळखून चवळीचा पर्याय स्वीकारल्याचे दिसत आहे.