कादंबरीकार रा. रं. बोराडे यांचा शासनाने गौरव करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:26 AM2021-04-02T04:26:09+5:302021-04-02T04:26:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार, नाटककार रा. रं. बोराडे यांचा उचित सन्मान शासनाने करण्याची मागणी मराठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार, नाटककार रा. रं. बोराडे यांचा उचित सन्मान शासनाने करण्याची मागणी मराठी कवी, लेखक संघटनेने केली आहे. तसे विनंतीपत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर दाभाडे यांनी पत्रात म्हटले आहे की, बोराडे हे मराठी साहित्यातील तपस्वी, चिंतनशील लेखक आहेत. मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. नवनिर्मितीद्वारे मराठीची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित असून पाचोळा ही कादंबरी हिंदी व इंग्रजी भाषेत अनुवादित झाली आहे. त्यांच्या साहित्यावर चित्रपटनिर्मितीही झाली आहे. मराठी नाटकात बोराडे यांनी स्वतःची मुद्रा उमटविली आहे. याची दखल शासनाने घ्यायला हवी तसेच योग्य सन्मान करायला हवा.
संघटनेचे उपाध्यक्ष महेंद्र कदम यांच्यासह सांगली जिल्हा कवी- लेखक संघटनेचे अभिजित पाटील, नितीन माळी, प्रा. अनिल पाटील, मनीषा पाटील, जयवंत आवटे, सचिन पाटील, नाना हलवाई आदींनी मागणीला पाठिंबा दिला आहे.