आता इथेनॉलच्या ७५ टक्के हिश्श्यासाठी आंदोलन, राजू शेट्टींचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 01:11 PM2022-12-13T13:11:08+5:302022-12-13T13:12:03+5:30

महाविकास आघाडी सरकारने अधिकार नसताना एफआरपीत बदल केला. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा डाव हाणून पाडला.

Now agitation for 75 percent share of ethanol, Raju Shetty warning | आता इथेनॉलच्या ७५ टक्के हिश्श्यासाठी आंदोलन, राजू शेट्टींचा इशारा 

संग्रहीत फोटो

Next

नेर्ले : महाविकास आघाडी सरकारने अधिकार नसताना एफआरपीत बदल केला. केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय हा बदल करता येत नाही. तरीही एफआरपीचे दोन तुकडे केले. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळाली. एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा डाव हाणून पाडला. यापुढे इथेनॉलमधील ७५ टक्के हिश्शासाठीही लढा उभारणार असल्याचा इशारा ‘स्वाभिमानी’चे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला.

तांबवे (ता. वाळवा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात उसाच्या एकरकमी एफआरपीसाठी केलेल्या आंदोलनास आलेल्या यशाबद्दल माजी खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, भागवत जाधव, पोपट मोरे, ॲड. एस. यू. संदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेट्टी म्हणाले, आता आपण रस्त्यावरची लढाई जिंकलो आहाेत. एफआरपीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली. मात्र, सांगली जिल्ह्यातील कारखानदार तयार नव्हते. मात्र, स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे त्यांना गुडघे टेकायला लावले. पहिली उचल २२०० ते २३०० रुपये देण्याचे त्यांचे धोरण होते. याने शेतकऱ्यांची सोसायटी तरी फिटली असती का? जिल्हा बँका कारखानदारांना १३ टक्के व्याजाने पैसे देतात. उत्पादन खर्च वाढला आहे. दोन वेळा महापूर येऊन गेला; पण शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोण तयार नाही. पण, यावेळी कोणालाही सोडणार नाही.

जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कारखानदार मुर्दाड आहेत. संघटनेच्या आंदोलनामुळे एकरकमी एफआरपी मिळाली. हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी कधी ऊस प्रश्नावर संसदेत आवाज उठवला का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललेत का? त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी देणे-घेणे नाही.

युवा आघाडीचे रविकिरण माने यांनी स्वागत केले. संतोष शेळके, जगन्नाथ भोसले, रामराव जाधव, भगवान सुतार, भास्कर मोरे, शंकर पाटील, दत्ताजी पाटील, शिवाजी पाटील, बबन पाटील, अतुल जाधव, नितीन पाटील यांनी संयोजन केले.

शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

वाळवा तालुक्यात शेअर्स मार्केटचे पेव फुटले आहे. तालुक्यात जवळ जवळ अडीचशे ते तीनशे कोटी रुपये शेअर्स मार्केटमध्ये बुडाले आहेत. शेतकऱ्यांच्या पोरांचे पैसे बुडविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; अन्यथा आंदाेलन करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

Web Title: Now agitation for 75 percent share of ethanol, Raju Shetty warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.