लाडक्या बहिणींसाठी आता ‘मुख्यमंत्री सुरक्षित बहीण’ योजना; एकनाथ शिंदे यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 01:11 PM2024-10-02T13:11:35+5:302024-10-02T13:12:56+5:30

विट्यात टेंभूच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन

Now Chief Minister Safe Sister scheme for ladki bahini yojana Eknath Shinde announcement  | लाडक्या बहिणींसाठी आता ‘मुख्यमंत्री सुरक्षित बहीण’ योजना; एकनाथ शिंदे यांची घोषणा 

लाडक्या बहिणींसाठी आता ‘मुख्यमंत्री सुरक्षित बहीण’ योजना; एकनाथ शिंदे यांची घोषणा 

विटा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दीड हजार रुपये मिळत आहेत. ते पैसे बाजारपेठेत येत असल्याने अर्थव्यवस्था मोठी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाच ट्रिलियन डॉलरचे व आपल्या राज्याचे एक ट्रिलियन डॉलरचे स्वप्न लाडक्या बहिणींमुळे पूर्ण होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय हे सरकार गप्प बसणार नाही. या योजनेप्रमाणे आता लाडक्या बहिणींसाठी ‘मुख्यमंत्री सुरक्षित बहीण योजना’ सुरू करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

विटा येथे मंगळवारी टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याचे भूमिपूजन व बसस्थानक नूतनीकरण कामाचा शुभारंभ शिंदे यांच्या हस्ते झाला. यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार शहाजीबापू पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, जिल्हा बॅंकेचे संचालक तानाजी पाटील व अमोल बाबर, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, सर्वसामान्य जनतेसाठी सर्वाधिक योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे; परंतु काहीजण चांगल्या कामात अडथळे आणण्याचे काम करीत आहेत; परंतु लाडक्या बहिणींनी सावत्र भावापासून सावध राहावे. ही योजना बंद करण्यासाठी न्यायालयात जाणाऱ्यांना आता कोल्हापुरी जोडा दाखविण्याची वेळ आली आहे. महायुती सरकारला ताकद द्या. हेच दीड हजार पुढे दोन, अडीच व तीन हजार दरमहा करण्याचा शब्द देतो.

पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले, दिवंगत अनिल बाबर यांनी टेंभू योजनेसाठी आपले आयुष्य घालविले. मला काही नको पण जनतेला द्या, अशी भूमिका घेणारे ते लोकप्रतिनिधी होते. सुहास बाबर म्हणाले, टेंभू योजना पूर्णत्वास जात असताना एका डोळ्यात आसू व दुसऱ्या डोळ्यात हसू आहे, कारण ज्यांनी या योजनेसाठी आयुष्य वेचले ते अनिलभाऊ आज नाहीत. त्यांच्या पश्चात त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. अनिलभाऊ शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी जगले. त्याच तत्त्वाने मीही अखेरच्या श्वासापर्यंत जनतेसाठी प्रामाणिक काम करेन. तानाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी टेंभू योजनेला दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली.

टेंभूच्या सहाव्या टप्प्याला अनिलभाऊंचे नाव..

दिवंगत आमदार अनिल बाबर हे आदर्श आमदार होते. त्यांच्यामुळे टेंभूचे पाणी शिवारात फिरत आहे. यात त्यांचे योगदान पाहता टेंभूच्या ६ व्या टप्प्याला आमदार अनिलभाऊ बाबर यांचे नाव देणार आहे, अशी घोषणा करून खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र करण्याची मागणी ही पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सुहास बाबर यांना ताकद देणार..

अनिलभाऊंची अपूर्ण काही स्वप्नं असतील ती आता सुहास बाबर यांनी पूर्ण करावीत. तुमच्या सर्वांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा राहू. अनिलभाऊंची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एक रुपयाही कमी पडणार नाही. सुहास बाबर यांना पूर्ण ताकद देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Web Title: Now Chief Minister Safe Sister scheme for ladki bahini yojana Eknath Shinde announcement 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.