सांगलीच्या स्थानकासाठी आता सल्लागार संस्था

By admin | Published: July 20, 2014 11:32 PM2014-07-20T23:32:20+5:302014-07-20T23:43:29+5:30

बीओटी योजना बारगळली : अद्ययावत बसस्थानकाचा प्रश्न आता शासनभरोसे; अहवालावर प्रकल्पाचे भवितव्य

Now the counselor organization for the Sangli station | सांगलीच्या स्थानकासाठी आता सल्लागार संस्था

सांगलीच्या स्थानकासाठी आता सल्लागार संस्था

Next

अविनाश कोळी -सांगली
‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या माधवनगर जकात नाक्यासमोरील सांगलीचे नवे बसस्थानक व डेपोच्या कामासमोर पुन्हा विघ्न आले आहे. यासाठी काढण्यात आलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाला नसल्याने, आता सल्लागार संस्था नियुक्त करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी पुन्हा निविदा मागविण्यात आल्या असून स्थानक विकासाचा प्रश्न आता शासनभरोसे अवलंबून आहे.
माधवनगर जकात नाक्यासमोरील शिवोदयनगर येथे नवे स्थानक उभारण्याबरोबरच जुन्या स्थानकाच्या विकासाचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहेत. सांगलीचे सध्याचे मध्यवर्ती स्थानक व शिवोदयनगर येथील प्रस्तावित स्थानक विकसित करण्यासाठी बीओटी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. जानेवारी २0१४ मध्ये यासंदर्भातील निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फेरनिविदा काढण्यात आल्यानंतरही त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने महामंडळासमोरील अडचणी वाढल्या. स्थानिक नेत्यांनी याबाबत महामंडळाच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडे बीओटीबाबत तक्रार केली. महामंडळानेच हा खर्च उचलावा, अशी मागणी केली. महामंडळ आता याबाबत सकारात्मक असले तरीही, त्यांच्यासमोर तांत्रिक अडचणीही निर्माण झाल्या आहेत. स्थानक विकासाची प्रकल्प आखणी, अहवाल, निविदाविषयक कार्यवाही करून सक्षम व सुयोग्य विकसकाची निवड करणे, याकामी ही सल्लागार संस्था नियुक्त केली जाणार आहे. त्यासाठी १६ जुलैरोजी राज्य परिवहन महामंडळाने निविदा प्रसिद्ध केली आहे.
राज्यातील ज्या स्थानकांच्या विकासाचे प्रयत्न चालू आहेत, त्यापैकी दोन स्थानकांच्या विकासाकरिता काढण्यात आलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. यामध्ये सांगलीतील मध्यवर्ती बसस्थानक, प्रस्तावित नवे स्थानक व नागपूरच्या मोर भवन येथील स्थानकाचा समावेश आहे. सांगलीचे मध्यवर्ती बसस्थानक अद्ययावत करण्याबरोबरच याठिकाणी गाळे उभारून त्याचे व्यापारीकरण करण्याचा प्रस्ताव होता. आता सल्लागार संस्था नियुक्त करून त्यांच्यामार्फत स्थानक विकासाबाबत सल्ला घेतला जाणार आहे. निविदा प्रक्रियेतून प्रतिसाद मिळणार, की शासनाला तो खर्च करावा लागणार, याबाबतही सल्लागार संस्थाच अहवाल देणार आहे.

सांगलीचे मध्यवर्ती बसस्थानक अद्ययावत करून शहर बसवाहतुकीची स्वतंत्र व्यवस्था करणे. व्यापारी संकुल उभारणे. डेपोचे शिवोदयनगर येथील जागेत स्थलांतर करणे. शिवोदयनगर येथे रिक्त जागेवर उपइमारतीसह अद्ययावत आगार, तसेच व्यापारी संकुल उभारणे.

Web Title: Now the counselor organization for the Sangli station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.