नव्या पुणे-बंगळुरू महामार्गावर आता विमान उतरण्याची सोय, ४० हजार कोटी रुपये अपेक्षित खर्च
By संतोष भिसे | Published: September 5, 2023 06:51 PM2023-09-05T18:51:09+5:302023-09-05T19:04:03+5:30
भूसंपादनाची प्राथमिक प्रक्रिया सुरू
संतोष भिसे
सांगली : बहुचर्चित पुणे-बंगळुरू हरित महामार्गाचा (ग्रीनफिल्ड कॉरिडॉर) प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला लवकरच सादर होणार आहे. भारतमाला प्रकल्पातून हे काम केले जात असून त्यासाठी ४० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यांतून महामार्गाचा प्रवास होणार आहे. सांगली जिल्ह्यात या तालुक्यांत त्यासाठी भूसंपादनाची प्राथमिक प्रक्रिया सुरू आहे.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाद्वारे हरित महामार्गाचे काम केले जाणार आहे. सध्याच्या पुणे-बंगळुरू महामार्गापेक्षा नवा महामार्ग लांबीला ९३ किलोमीटरने कमी आहे, त्यामुळे सुमारे दोन तास लवकर पुण्याहून बंगळुरू गाठता येणार आहे. सांगली जिल्ह्यात खानापूर, तासगाव, मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांतून त्याचा प्रवास होईल. यानिमित्ताने जिल्ह्याला चौथा राष्ट्रीय महामार्ग मिळणार आहे. खानापूर तालुक्यातील माहुली, वलखड, वेजेगाव, भेंडवडे, साळशिंगे, जोंधळखिंडी, माधळमुठी, वासुंबे, रेणावी, रेवणगाव, घोटी बुद्रुक आणि घोटी खुर्द या गावांतून जाईल. तासगाव तालुक्यातील कचरेवाडी, नरसेवाडी, किंदरवाडी, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे, शिरगाव, हातनोली, बस्तवडे, सावळज, वज्रचौंडे, मणेराजुरी आणि गव्हाणमधून महामार्ग जाईल.
कवठेमहांकाळ तालुक्यात बोरगाव, मळणगाव, हरोली, देशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकटोळी, रामपूरवाडी आणि कोगनोळीमध्ये भूसंपादन होईल. मिरज तालुक्यातील सलगरे, बेळंकी आणि संतोषवाडी या गावांचाही महामार्गात समावेश आहे.
दृष्टिक्षेपात हरित महामार्ग
- एकूण लांबी : ७४५ किलोमीटर
- एकूण अंदाजित खर्च : ४० हजार कोटी
- मार्गिकांची संख्या : ८
- रुंदी : १०० मीटर (पुणे-मुंबई महामार्गापेक्षा रुंद)
- काँक्रीटच्या समृद्धी महामार्गासारखे अपघात टाळण्यासाठी डांबरीकरण
- ताशी १२० किलोमीटर गतीने प्रवास शक्य
- पुण्यात वरवे बुद्रुकपासून प्रारंभ
- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून जाणार
चक्क विमान उतरविण्याची सोय
नव्या पुणे-बंगळुरू महामार्गावर आपत्कालीन परिस्थितीत विमान थेट महामार्गावर उतरविण्यासाठी पाच किलोमीटर लांबीची हवाई धावपट्टी असेल. अशी धावपट्टी असणारा हा महाराष्ट्रातील समृद्धीनंतर कदाचित एकमेव महामार्ग असेल. भविष्यातील नव्या महामार्गांसाठी हा मॉडेल ठरणार आहे.
मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यातून...
सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण आणि खटाव तालुक्यांतून महामार्गाचा प्रवास असेल. सांगली जिल्ह्यात खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यांतून जाईल. कर्नाटकात बेळगावी, बागलकोट, गदग, कोप्पल, बल्लारी, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर यामार्गे बंगळुरूला जोडला जाईल.