आता लक्ष इस्लामपूर बाजार समितीकडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2015 11:14 PM2015-06-21T23:14:54+5:302015-06-22T00:19:57+5:30

पडघम वाजू लागले : जयंतरावांविरोधात विरोधकांचे जुजबी आव्हान; तडजोडीच्या राजकारणाची चिन्हे

Now focus on Ulam Bazar Samiti ... | आता लक्ष इस्लामपूर बाजार समितीकडे...

आता लक्ष इस्लामपूर बाजार समितीकडे...

Next

अशोक पाटील -इस्लामपूर
य. मो. कृष्णा सह. साखर कारखान्याच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच, आता इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सत्ताधारी आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात विरोधकांचे जुजबी आव्हान असल्याने हे विरोधक जयंत पाटील यांच्याबरोबर मिळते—जुळते घेऊन काही तरी पदरात पाडून घेण्याच्या तयारीत आहेत.
राजारामबापू उद्योग समूहातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका जवळजवळ बिनविरोध झाल्या आहेत, तर सातारा जिल्ह्यातील कृष्णा सह. साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत चुरशीने झाली. या निवडणुकीत जयंत पाटील यांचे जवळजवळ ९0 टक्के कार्यकर्ते सक्रिय होते. या निवडणुकीचा धुरळा शांत होतो न होतो तोच, वाळवा तालुक्यातील जयंत पाटील समर्थकांनी आपला मोर्चा बाजार समितीकडे वळविला आहे.
गत निवडणुकीत जयंत पाटील यांच्यासोबत नानासाहेब महाडिक यांनी मिळते-जुळते घेतले होते. यावेळी मात्र त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले आहेत, तर भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी या निवडणुकीविषयी मौन पाळले आहे.
ही निवडणूक १९ संचालकांच्या निवडीसाठी होत असून गतवेळी शिराळा मतदार संघातील कासेगाव, पेठ, ठाणापुडे, ऐतवडे खुर्द, तांदुळवाडी, तर वाळवा तालुक्यातील साखराळे, शिरटे, नागाव, नरसिंहपूर, बहाद्दूरवाडी, कोरेगाव, बावची, अहिरवाडी, साटपेवाडी, शिरगाव, इस्लामपूर, बोरगाव या गावांतील कार्यकर्त्यांना संचालक पदाची संधी मिळाली आहे. यावेळी मात्र नवख्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार जयंत पाटील करीत आहेत.
एकूणच बाजार समितीसाठी तडजोडीच्या राजकारणाची चिन्हे दिसत आहेत.

कोरे यांचा दावा...
इस्लामपूरमधून बाळासाहेब कोरे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यांनी प्रसिध्दीपत्रकात, मी जयंत पाटील यांचा कसा समर्थक आहे, याचाच जास्त उल्लेख केला आहे. पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, भगवान पाटील आणि शहाजी पाटील यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. तसेच उमेदवारी न दिल्यास संबंधितांकडे इस्लामपूरच्या पांढरीतील देवच पाहील, असाही उल्लेख केला आहे.


व्यापाऱ्यांची मागणी
एक तराजू घेऊन कांदा, बटाट्याचा व्यापार करणाऱ्या अनिल पावणे यांनी, कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक पद मिळावे यासाठी अनेकवेळा प्रयत्न केले. परंतु त्यांना स्थानिक नेत्यांनी न्याय दिला नाही. यावेळी तरी जयंत पाटील यांनी त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी बाजारातील इतर व्यापाऱ्यांनी केली आहे.
 

Web Title: Now focus on Ulam Bazar Samiti ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.